लोकसभेची रणधुमाळी संपली आणि आता विधानसभेच बिगुल वाजणार…लोकसभेला महाराष्ट्राने जनता एका बाजूला आणि नेतेमंडळी एका बाजूला झाल्याचं पाहिलं आणि पहिल्यांदाच जनतेने पुढाऱ्यांचं ऐकलं नाही.अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष बारामती लोकसभेकडे होते आणि वर सांगितल्याप्रमाणे कारणही याच पद्धतीने होते.
इंदापूर बारामती दौंड या तीन तालुक्यात तर लोकसभेवेळी पोलिंग एजंटची पंचायत झाल्याची चर्चा आहे. पण त्यातही बारामतीत पवारांची ताकद टिकून राहिली पण प्रश्न होता तो इंदापूर आणि दौंडचा.कठीण काळात पवार साहेबांच्या बरोबर दौंड तालुक्यात आणि इंदापूर तालुक्यात दोन आप्पासाहेब उभे राहिले..एक होते आप्पासाहेब जगदाळे तर दुसरे होते आप्पासाहेब पवार. हे दोन्ही नेते सुप्रियाताई सुळे निवडून यावेत म्हणून प्रयत्नांची पराकाष्टा करत होते व त्यातच या दोघांनी सामान्य जनतेची मूठ बांधली आणि त्यात त्यांना यशही मिळाले. या दोन्ही नेत्यांना माहीत होते की जर सुप्रियाताई पडतील तर आपलं राजकीय अस्तित्व संपणार आहे पण सध्याच्या परिस्थितीत पवार साहेबांबरोबर उभा राहणं महत्त्वाचं वाटलं म्हणून त्यांनी पवार साहेबांनाच साथ दिली हे निष्ठावंतांचे उदाहरण म्हणता येईल.
दौंड तालुक्यात चर्चा आहे की आप्पासाहेब पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून तिकीट मिळाले आहे अशी चर्चा आहे परंतु अद्याप पक्षाच्या कार्यालयाकडून अधिकृत कोणती घोषणा झाली नाही. तर दुसरीकडे इंदापूर तालुक्यात आप्पासाहेब जगदाळे, प्रवीण भैय्या माने तर नव्याने चर्चेत आलेले हर्षवर्धन पाटील या तिघांमध्ये रस्सीखेच असल्याचे दिसून येते.
वास्तविक पाहता कठीण काळात पक्षाबरोबर राहिलेल्या निष्ठवंतांना पवार साहेब तिकीट देणार की उर्वरित इतर दोघांपैकी एकाचा विचार करणार याकडे तालुक्याचे लक्ष लागलेले आहे. हे नुसतं तिकीट देण्यापुरताच विषय राहिलेला नाही तर पवार साहेब कोणाला तिकीट देणार यातून एक चांगला संदेशही महाराष्ट्राला जाण्याची शक्यता आहे. तर मी सध्या भाजपमध्येच आहे, असे सांगत हर्षवर्धन पाटील यांनी सावध भूमिका घेतली असली तरी काही कार्यकर्त्यांचा तुतारी हातात घेण्यासाठी हर्षवर्धन पाटलांकडे आग्रह कायम आहे.
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान संचालक आणि इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे यांच्या उमेदवारीच्या मागणीसाठी इंदापुरातून शिष्टमंडळ शरद पवारांच्या भेटीला गेले होते. शरद पवारांनी म्हणणे ऐकून घेवून निर्णय जाहीर केला नसला तरी सकारात्मक चर्चा झाल्याचे सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.गेल्या आठवड्याभरात इंदापूर तालुक्यातील पश्चिम भागातील नेत्यांनीही शरद पवार यांची भेट घेत आप्पासाहेब जगदाळे यांना उमेदवारी देण्याची मागणी केली होती.एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून इंदापूर विधानसभेसाठी आप्पासाहेब जगदाळे यांच्या नावाची जोरदार मोर्चेबांधणी पदाधिकाऱ्यांकडून सुरू असल्याचे दिसून येत आहे..
तर दुसरीकडे अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी अप्रत्यक्षपणे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांची उमेदवारी जाहीर केल्याने माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना महायुतीमध्ये इंदापूर विधानसभेची उमेदवारी मिळणार नसल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.आणि हर्षवर्धन पाटील यांनी अद्याप जाहीर न केलेल्या भूमिकेमुळे शरद पवार गटात पाटील यांचा प्रवेश ही सध्या तरी फक्त चर्चा असल्याचे दिसून येत आहे. हर्षवर्धन पाटील यांच्याकडे एक लाख पेक्षा जास्त मताधिक्य असणारा मतदार असल्याचा दावा थेट कार्यकर्त्यांकडून केला जात असला तरी इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची लोकसभेच्या निकालानंतरची ताकद पाहता शरद पवार इंदापुरात चमत्कार करू शकतात,असे मत सर्वसामान्यांसह जाणकारांकडून व्यक्त होत आहे.त्यामुळे महायुतीचे तिकीट नसणे व दुसऱ्या पक्षात जाण्याचा निर्णय लांबणीवर जात असल्याने हर्षवर्धन पाटील यांच्या राजकीय अडचणी वाढू शकतात.. आता हर्षवर्धन पाटील हे मुरब्बी राजकारणी असल्याने काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सध्या आप्पासाहेब पवार व प्रवीण माने हे आपापल्या पद्धतीने जनमानसात जाऊन गाठीभेटी घेत आपली भूमिका मांडत आहे. तसं पाहायला गेलं तर प्रवीण माने यांनी सुद्धा लोकसभेच्या प्रचारामध्ये सुप्रियाताईंना मतदान करावे यासाठीचा संदेशही त्यांनी देण्यात आलेला होता परंतु काही दिवसांनी एका अदृश्य शक्तीच्या दबावाला बळी पडत त्यांनी पुन्हा अजितदादांची साथ दिली अशी लोकांमध्ये चर्चा होती. व त्यानंतर आप्पासाहेब जगदाळे गावोगावी जाऊन लोकांच्या गाठीभेटी घेणे प्रचार यंत्रणामध्ये सुसूत्रता आणणे व जुन्या जाणत्या लोकांची मूठ बांधणे यामध्ये आप्पासाहेब जगदाळे यशस्वी झाले होते. तर इंदापूर शहराचा विचार करायचा झाला तर भरत शेठ शहा यांच्या माध्यमातून तळागाळातील वर्ग हा तुतारी घराघरापर्यंत पोहोचवत होता.त्यामुळे सर्व नेतेमंडळी जरी एका बाजूला असले तरी इंदापूर तालुक्यात 25000 पेक्षा जास्त लीड देण्यास त्यांची रणनीती यशस्वी झाली होती म्हणून आता पवार साहेब एकनिष्ठतेला महत्त्व देतात की त्यांच्या डोक्यात आणखी काही गुगली आहे खरं तर हे पाहण्याकरिता काही आठवडे वाट पाहावी लागेल परंतु कोणत्याही सोशल मीडियामध्ये सक्रिय न होता गावोगावी व घरोघरी पोहोचत आप्पासाहेब जगदाळे यांची प्रचार यंत्रणा सक्रिय झाली आहे. व येणाऱ्या विधानसभेची भूमिका मांडत आपल्यालाच पवार साहेब तिकीट देतील या आशेवर प्रचार यंत्रणा जोमात चालू असल्याचे चित्र सध्या इंदापूर तालुक्यात दिसत आहे.