इंदापूर तालुक्यात सध्या वीरश्री मालोजीराजे गढी संवर्धनाचा विषय चांगला चर्चेत आला असून आता शिवसेनेने सुद्धा यामध्ये उडी घेतली आहे शिवसेना शहर प्रमुख अशोक देवकर म्हणाले की, “ज्या युगपुरुष व्यक्तिमत्त्वामुळे महाराष्ट्रासह देशाची ओळख निर्माण झाली ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि याच महाराजांचे आजोबा वीरश्री मालोजीराजे भोसले यांचे वास्तव्य आणि वीरमरण इंदापूर शहरात झाले. वीरश्री मालोजीराजे यांच्या स्मृती जपणं हे आपलं कर्तव्य आहे त्यासाठी इंदापूर शहरातील ऐतिहासिक मालोजीराजे गढी जपणे व त्याचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे.” सद्यस्थितीला ही गढी अतिक्रमणाच्या विळख्यात असून आत्ताच जर याचे संवर्धन झाले नाही तर इतिहासाचे अवशेष संपून जातील. या सर्व कारणांमुळे गढीचे संवर्धन होण्याकरिता पुढील आठवड्यात माजी राज्यमंत्री विजय बापू शिवतारे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याचे शिवसेना शहर प्रमुख अशोक देवकर यांनी सांगितले.
इंदापूर येथे मालोजीराजे भोसले यांची इतिहासाची साक्ष देणारी ऐतिहासिक गढी असून मालोजीराजे भोसले यांना इंदापूर येथे झालेल्या लढाईत वीरमरण प्राप्त झाले. त्यांच्या पादुका इंदापूर शहरात आहेत. मालोजीराजांचे स्मारक उभारणे, इंदापूर शहरातील ऐतिहासिक विविध ठिकाणांचे संगोपन करणे, ऐतिहासिक स्थळ असलेला रामेश्वर नाका, ऐतिहासिक भार्गवराम तलाव सुधारणा करणे, इंदापूर शहरातील विविध ठिकाणची जुनी ऐतिहासिक शिल्पे संरक्षित करणे या संदर्भात मुख्यमंत्र्यांना माहिती देणार आहोत व मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल याची अपेक्षा आहे असेही शिवसेना शहरप्रमुख अशोक देवकर म्हणाले.
इंदापूर तालुक्यातील शिवभक्त आता याविषयी आक्रमक झालेले आहेत व कोणत्याही परिस्थितीत गढीचे संवर्धन झाले पाहिजे अशीच त्यांची भूमिका आहे.यापूर्वी गेल्या आठवड्यातच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे सुधीर मुनगंटीवार यांना भेटले असून त्यांच्याकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे त्यामुळे वीरश्री मालोजीराजे यांची गढी पुन्हा एकदा नावारुपाला येईल अशी अपेक्षा इंदापूरकरांना वाटते.
Home Uncategorized इंदापुरातील वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढी संवर्धनाविषयी लवकरच शिवतरे बापूंच्या माध्यमातून मुख्यमंत्री...