आजपासून आ.दत्तात्रय भरणे यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन व आमरण उपोषण… वाचा सविस्तर.

मराठा आरक्षण संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी याठिकाणी चालु केलेल्या आमरण उपोषणाच्या समर्थनार्थ पाठींबा म्हणुन इंदापूर तालुका सकल मराठा समाजातील काही समाज बांधव आज शनिवारी दि.१७ फेब्रुबारी पासून इंदापूरचे लोकप्रतिनिधी माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांच्या भरणेवाडी निवासस्थाना बाहेर ठिय्या आंदोलन करणार आहेत.या संदर्भातील लेखी निवेदन इंदापूर तहसिल कार्यालयास शुक्रवारी देण्यात आले आहे.शुक्रवारी दुपारी सकल मराठा समाजाची इंदापूर शहरातील शासकीय विश्रामगृहात बैठक पार पडली असून या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला आहे.यानंतर इंदापूर नगरपरिषदेसमोरील प्रांगणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मनोज जारंगे पाटील यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध देखील नोंदवण्यात आला.मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी या ठिकाणी आमरण उपोषण सुरू असून जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी गेल्या काही महिन्यात राज्यातील प्रत्येक तालुक्यात गावोगावी आंदोलने उपोषणे झाली. आता मात्र आरक्षणाची लढाई उग्ररूप धारण करताना पाहायला मिळत असून कालपर्यंत जरांगे पाटील यांनी पाण्याचा थेंबही घेतला नव्हता, समाजाने घातलेल्या समजुती नंतर जरांगे पाटील यांनी उपचार घेतले आहेत. आता मात्र मराठा समाजाने थेट आपापल्या तालुक्यात लोकप्रतिनिधींनाच लक्ष करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सरकारने जर वेळेत निर्णय नाही केला तर आरक्षणाचा मुद्दा अधिक चिघळण्याची शक्यता आहे.लोकप्रतिनिधी दत्तात्रय भरणे यांनी दि. २० फेब्रुवारी २०२४ रोजीच्या होणाऱ्या आधिवेशनामध्ये मराठा आरक्षण संदर्भातील सगेसोयरे संदर्भात कायदा पारीत करण्यासाठी मराठा समाजाच्या समर्थनार्थ आवाज उठवावा यासाठी त्यांच्या अंथुर्णे (भरणेवाडी) येथील निवासस्थानासमोर महादेव सोमवंशी,रोहित उर्फ बंडा पाटील, सोमनाथ दशरथ जाधव आणि पवन घोगरे हे ठिय्या आंदोलनासह आमरण उपोषण करणार आहेत. याचसोबत इंदापूर तालुक्यातील कांदलगाव येथे सुरू असलेले आमरण उपोषण भरणेवाडी येथे स्थलांतरित केले जाणार असून उपोषणकर्ते बंडू गोपाळ ननावरे आणि सौदागर बाळासाहेब ननवरे हे देखील आमदार भरणे यांच्या निवासस्थाना समोर आमरण उपोषण करणार आहेत.



 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here