अभिनेते सयाजी शिंदे यांना साताऱ्या मधील माळरानावर वृक्षारोपण करण्याची दिलेली परवानगी नाकारली. जाणून घ्या कारण.

अभिनेते सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई संस्थेला सातारा जिल्ह्यातील म्हसवे गावातील माळरानावर वृक्षारोपण करण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. या प्रकरणी शिंदे यांनी नुकतीच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली.
सातारा पोलीस अधीक्षकांकडून याबाबतचा अहवाल मागवण्यात येणार आहे. परवानगी देण्याबाबतच्या अडचणी जाणून घेण्यात येणार आहेत. येत्या आठवड्याभरात ही परवानगी मिळणार असल्याचं अभिनेते सयाजी शिंदे यांनी सांगितलं.
नेमकं प्रकरण काय?
सातारा जिल्ह्यातील म्हसवे गावात पोलीस दलाची एकशे आठ एकर जागा आहे. या ठिकाणी पोलीस दलाकडून गोळीबाराचा सराव केला जातो.
तीन वर्षापूर्वी या जागेवर सह्याद्री देवराई या सामाजिक संस्थेला काही अटींसह वृक्षारोपण करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार सध्या असलेल्या 108 एकर जागेपैकी गोळीबाराचा सराव करण्यासाठी लागणारी जागा सोडून उपलब्ध 15 ते 20 एकर जागेवर जैवविविधता उद्यान उभारण्याची परवानगी देण्यात आली होती.
त्यासाठी सह्याद्री देवराई संस्थेकडून या ठिकाणी कोणताही फलक उभारला जाणार नाही तसंच वृक्षलागवड केलेल्या जागेवर संस्थेला मालकी हक्क किंवा वहिवाटीचा कोणताही हक्क राहणार नसल्याची अट घालण्यात आली होती.याबाबत 2018 मध्ये तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी उद्यान उभारणीत सातारा पोलिसांचे सहकार्य राहील, असं परवानगी पत्र दिलं होतं. त्यानंतर तत्कालीन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी देखील ही परवानगी कायम ठेवली होती.
मात्र साताराचे विद्यमान पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी संस्थेला या जागेवर वृक्षलागवड करता येणार नाही, असं पत्र पाठवत ही परवानगी नसल्याचं सांगितलं.
पोलीस दलाच्या जागेवर जैवविविधता उद्यान उभारण्याचा प्रस्ताव मुंबई पोलीस महासंचालकानी अमान्य केल्याचा उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे. त्यानुसार इथून पुढे या जागेची देखभाल आणि जबाबदारी सातारा पोलीस करतील असंही या पत्रात म्हटलंय.
दरम्यान, डिसेंबर 2020 मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सह्याद्री देवराई संस्थेला संबंधित कार्यक्षेत्रात वृक्षलागवड आणि रोपवाटिका कार्यक्रमासाठी वनविभागाकडून सहकार्य करण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या होत्या. सह्याद्री देवराई या संस्थेकडून गेली 9 वर्ष राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धानासाठी प्रयत्न केले जात आहेत. पण सध्या सातारा जिल्ह्यातील म्हसवे गावाच्या ह्दीतील माळरानावर वृक्षारोपण करण्याची परवानगी नाकारल्याने हे काम थांबवण्यात आले आहे.
2018 पासून सह्याद्री देवराई संस्थेकडून या जागेवर काही एकर जागेवर 112 वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. या जैवविविधता उद्यानात दुर्मिळ, औषधी वनस्पती, विविध प्रकारचे पाम , बांबू, फणस, गवताच्या विविध प्रजातींची लागवड करण्यात आली आहे. शेततळ्यासह, जलसंधारण तलाव तसंच काही शिलाखंड शिल्पदेखील उभारण्यात आली आहेत.
पोलीस दलाकडून परवानगी नाकारल्याबाबत गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी बोलताना सांगितलं की, सातारा मधील म्हसवे गावाच्या ह्द्दीतील पोलीस दलाच्या जागेवर पोलीसांचा गोळीबाराचा सराव सुरू असतो. या सरावासाठी स्वच्छ सूर्यप्रकाश, मानवी वस्ती आसपास नसणं, कोणताही अडथळा येऊ नये अशा गोष्टींची गरज असते. ते लक्षात घेता गोळीबाराचा सराव करण्यासाठी सध्या इतकी मोठी जागा इतरत्र उपलब्ध नाही. त्यामुळं शिंदे याना वृक्षलागवडीसाठी परवानगी नाकारल्याची शक्यता असल्याचं देसाई यांनी सांगितलं.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here