अडीच वर्ष अनैसर्गिक महाविकास आघाडीच्या सरकारला जनता कंटाळली होती- माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

युतीचे जनतेचे सरकार राज्यात सत्तारूढ- हर्षवर्धन पाटील
– तालुक्याला अधिकचा झुकता निधी मिळणार!
– बावडा येथे हर्षवर्धन पाटील यांचा सत्कार
इंदापूर: प्रतिनिधी दि.10/7/22
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्वाखाली राज्यात युतीचे जनतेचे सरकार सत्तारूढ झाले आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील जनतेमध्ये व भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. युती सरकारच्या माध्यमातून तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचे नियोजन केले जाईल व त्यासाठी तालुक्याला निश्चितपणे अधिकचा झुकता निधी मिळेल, असे प्रतिपादन भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी (दि.10) केले.
बावडा येथे राज्यात भाजप-शिवसेना युतीचे नवीन सरकार सत्तारूढ झालेबद्दल भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. सदर प्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की
राज्यात गेली अडीच वर्षे तीन पक्षांच्या अनैसर्गिक पद्धतीने एकत्र आलेल्या महाविकास आघाडी सरकारला जनता कंटाळली होती. मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.जे.पी.नड्डा, गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात युतीचे सरकार सत्तेवर आल्याने विकासाचे नवे पर्व आता सुरू झाले आहे, असे गौरोदगार हर्षवर्धन पाटील यांनी काढले.इंदापूर तालुक्यात गेली अडीच वर्षे सत्तेच्या माध्यमातून अहंकार निर्माण झाला होता. पदाच्या माध्यमातून गावोगावी त्रास दिला जात होता, मात्र आता त्यांची सत्तेची घमेंड उतरली आहे. आपण 19 वर्षे मंत्री होतो पण जनतेला कधी त्रास दिला नाही. आता आपले सरकार सत्तेवर आल्यामुळे गावोगावी निधी देऊन रचनात्मक विकास कामे केली जातील, असे हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले.
भाजप कार्यकर्त्यांनी सक्रियपणे काम केले पाहिजे. अपघात, आजारपण आदी जनतेच्या अडचणीच्या, दुःखाच्या काळात भाजप कार्यकर्त्यांनी धावून जाऊन दिलासा देण्याचे काम केले पाहिजे. राज्यात युतीचे सरकार सत्तेवाल्याने आपला अडचणीचा काळ संपला आहे, येणारा काळ हा तालुक्याच्या विकासाचा असणार आहे. पक्षाशी ज्यांनी गद्दारी केली, त्रास दिला अशा कार्यकर्त्यांना जवळ केले जाणार नाही, असे हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले.
प्रास्ताविक अमरसिंह पाटील यांनी केले. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने ज्येष्ठ कार्यकर्ते शिवदास घोलप, सहकार महर्षी मोहिते पाटील कारखान्याचे संचालक महादेवराव घाडगे, शिवाजीराव पवार यांच्या हस्ते हर्षवर्धन पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बावडा व परिसरातील गावांमधील पदाधिकारी, भाजप कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. निरा भिमा कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील यांनी आभार मानले.लोणी देवकर एमआयडीसीत नवीन कंपन्या येणार – लोणी देवकर येथे मी राज्यमंत्री असताना तालुक्याच्या प्रगतीसाठी दूरदृष्टी ठेवून पंचतारांकित एमआयडीसी आणली. या एमआयडीसीमध्ये नवीन स्थापन झालेल्या युती सरकारच्या माध्यमातून नवीन मोठे प्रकल्प आणणेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेशी चर्चा झाली आहे. या नवीन प्रकल्पांच्या माध्यमातून युवकांना मोठ्या प्रमाणावरती रोजगार उपलब्ध होईल, असे यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here