सासवड – सध्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा परिषदेचे मालक झाले आहेत. सगळ्या विषय समित्या जिल्हा परिषद सदस्य बरखास्त झाले आहेत, यामुळे आयुष प्रसाद यांना काम सांगावे लागत आहे.पूर्वी ते म्हणायचे की पदाधिकाऱ्यांना सांगा करतो, मीच सदस्यांना निवडून आणायचे आणि पुन्हा काम कर बाबा काम कर बाबा असे म्हणायचे त्यामुळे आता तिकीट देताना बघतोच, असा सज्जड दम कार्यकर्तांना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी भरला.खानवडी (ता. पुरंदर) येथे जिल्हा परिषद पुणे व फियाट इंडिया ऑटोमोबाइल प्रायव्हेट लिमिटेड रांजणगाव यांच्या सीएसआर निधीतून ज्योती सावित्री इंटरनॅशनल स्कूल शाळेच्या इमारतीचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी खासदार सुप्रिया सुळे, पुरंदर-हवेलीचे आमादर संजय जगताप, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, माजी आमदार आशोक टेकवडे, राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा भारती शेवाळे, सुदामराव इंगळे, दत्ता झुरंगे, संभाजीराव झेंडे, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पुरुषोत्तम जगताप, विजय कोलते, प्रवीण शिंदे, प्रमोद काकडे, जयदीप बारभाई, मार्तंड भोंडे, स्वप्नाली होले, जालिंदर कामठे, गौरी कुंजीर, शामकांत भिंताडे, विराज काकडे, अमर माने, संध्या गायकवाड, प्रमोद गायकवाड, ईश्वर बागमार, राकेश बावेज, प्रदिप पोमण, नलिनी लोळे, सुनिता कोलते, पी. एस. मेमाणे, संभाजी जगताप यांच्यासह आदी मान्यवर उपस्थिती होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष जराड व बाळासाहेब फडतरे यांनी तर सरपंच स्वप्नली होले यांनी आभार मानले.उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, खानवडी येथील ज्योती सावित्री इंटरनॅशनल स्कूलमध्ये फक्त मुलींना शिक्षण दिले जाईल. यासाठी ग्रामपंचायतीने देखील मदत करणे गरजेचे आहे. सध्या ग्रामपंचायतीने 12 एकर जमीन शिक्षण संस्थेसाठी दिली असली तरी भविष्यात गरज पडली तर अधिक जमीन त्या ठिकाणी द्यावी. वयात बागांमध्ये लॉजिस्टिक पार्क करण्यासाठी प्रयत्न करू, असे त्यांनी नमूद केले मुंबई ते हैदराबाद अशी बुलेट ट्रेन सध्या होत आहे. या कामी की बुलेट ट्रेन पुणे, सोलापूर या जिल्ह्यांमधून जात आहे यासाठीचा सर्व्हेचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांनी लगेच या कामाला विरोध करू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.👉 आमदारांच्या मागण्या :-खानवडी येथे महात्मा फुले नॉलेज सीटी पार्क उभारावे, पुरंदर उपसा सिंचन योजनेसाठी अधिकचा निधी मिळावा. गुंजवणीच्या पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा, अशी मागणी आमदार संजय जगताप यांनी अजित पवार यांच्याकडे केली.सध्या राज्यामध्ये काही लोकांना दंगली घडवायच्या आहेत. भोंगे काढण्याच्या प्रकरणामुळे राज्यातील प्रमुख देवस्थानच्या काकड आरत्या बंद झाल्या आहेत.हे यांच्या का लक्षात येत नाही. राज्यात जातीय सलोखा ठेवणे फार महत्त्वाचे आहे आणि तो ठेवला जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.पुरंदरची ओळख ही संपूर्ण देशातील होत आहे तर पुरंदर तालुक्याच्या कडेने चार मोठे रिंग रोड होणार आहेत. सासवड येथील मंदिरांच्या सुशोभीकरणासाठी 17 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी दोन कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. राज्यामध्ये एक नंबरचा वाटाणा हा पुरंदरचा आहे. या देशातले एक नंबरचे अंजीर कुठे होत असतील तर ते पुरंदरमध्ये होतोय. तसेच तो परदेशात जातोय ही अभिमानाची बाब आहे, असे खा. सुप्रिया सुळे यांनी सांगितले..