हर घर तिरंगा अभियानात प्रत्येकाने उस्फुर्तपणे सहभागी व्हावे- हर्षवर्धन पाटील
इंदापूर: प्रतिनिधी दि.10/8/22
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शनिवार दि.13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार ‘हर घर तिरंगा ’ (घरोघरी तिरंगा) हे ऐतिहासिक अभियान राबविण्यात येत आहे. या देशप्रेमी अभियानामध्ये प्रत्येक नागरिकाने उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, अशी आवाहन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बावडा येथे केले.
ते पुढे म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यलढ्याचा इतिहासापासून चालू पिढीला प्रेरणा मिळावी, स्वातंत्रसैनिकांनी दिलेल्या योगदानाची जाणीव नागरिकांच्या मनामध्ये राहावी, यासाठी ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम अत्यंत उपयुक्त आहे. जगातील सर्वात मोठे हे अभियान ठरेल, असे गौरवोद्गार यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी काढले.
‘हर घर तिरंगा’ अभियान हे पंथ, पक्ष, धर्मविरहित असून देशाप्रती राष्ट्रभावना जागृत करणे, ज्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला अशी पिढी आता काळाच्या पडद्याआड चालली आहे. त्यामुळे नव्या पिढीला स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाचे स्मरण करून देणे हा उदात्त हेतू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हर घर तिरंगा या संकल्पनेमध्ये आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. यावेळी हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते संस्था व संघटनांच्या वतीने युवकांना ध्वजाचे वितरण करण्यात आले.यावेळी सरपंच किरण पाटील, मनोज पाटील, विठ्ठल घोगरे, अमोल घोगरे, पवनराजे घोगरे, सचिन सावंत, प्राचार्य डी. आर. घोगरे, प्राचार्य जी. एस. घोरपडे, प्राचार्य भीमराव आवारे, प्राचार्य सी. टी. कोकाटे, मुख्याध्यापक ए. बी. सुळे आदी उपस्थित होते.