इंदापूर: शेटफळ हवेली तलाव बचाव कृती समितीने शेटफळ तलावावरील सर्व लाभार्थी शेतकरी बंधूं भगिर्नीना आवाहन करणारे पत्रक तयार केले असून या पत्रकामध्ये असे लिहिलेले आहे की,”शासनाच्या जलसंपदा विभागाने अत्यंत अन्यायकारक पध्दतीने, सर्व नियम धाब्यावर बसवून शेटफळ तलावतून ६५ शेतकर्यांना उचल पाणी परवाना देण्याचा निर्णय घेऊन,दहा गावातील शेतकऱ्यांच्या पाटचारीने पाणी मिळणयाच्या हक्कावर गदा आणलेली आहे. या दुर्दैवी निर्णयामुळे तलावाचा भराव खोदून 3Hp पासून 20 Hp पर्यंतच्या मोटारी अहोरात्र चालवून तलावातील पाणी “मनमानेल’ पध्दतीने उपसण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.अशाप्रकारे पाणी उपसण्याच्या प्रकारावर शासनाची भ्रष्ट यंत्रणा नियंत्रण ठेवू शकत नाही, हे सत्य नाकारता येत नाही. गेल्या १२५ वर्षात जे घडले नाही. ते आता घडविण्याचा मोठा प्रताप जलसंपदा विभागाने केला आहे. या निर्णयामुळे शेटफळ, सुरवड, वकीलवस्ती, भोडणी, लाखेवाडी, बावडा, निरनिमगांव, पिठेवाडी, भगतवाडी, सराटी या दहा गावातील हजारो शेतकऱ्यांच्या शेतीला, जनावरांना, गावोगावच्या पाणीपुरवठा योजनांना पाणी मिळणे दुरापस्त होणार आहे. या दहा गावातील परिसराचे वाळवंट होण्यास फारसा विलंब लागणार नाही. या शासकीय निर्णयाचा निषेध करण्यासाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व आप्पासाहेब जगदाळे,यांच्या नेतृत्वाखाली गुरूवार दि.१७ फेब्रुवारी २०२२ रोजी, सकाळी ठिक.११ वाजता वकीलवस्ती येथील पाटबंधारे कार्यालयासमोर रस्ता रोको व धरणे आंदोलनाचे आयोजन केले आहे. असे या पत्रकात सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले आहे.
अशा पद्धतीने शेटफळ हवेली तलाव बचाव कृती समितीने आक्रमक पवित्रा घेत 17 फेब्रुवारी रोजी वकीलवस्ती येथे रस्ता रोको,धरणे आंदोलन करून या पाणी परवानग्या रद्द करण्याच्या संदर्भात एकजूट होण्याचे सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले आहे.