• भाजपने 3 पत्रे दाखवित भरणेंचा दावा खोटा आहे असा केला आरोप.
• मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह रवींद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील यांचे भाजपकडून अभिनंदन
• आमदारांनी खोटे श्रेय घेणे आता तरी बंद करावे – हर्षवर्धन पाटील.
इंदापूर प्रतिनिधी: तावशी उदमाईवाडी थोरातवाडी रस्ता प्रतिमा 194 येथे नीरा नदीवर पूल मंजुरीसाठी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपचे नेते असलेले बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचेकडे प्रयत्न केले. हर्षवर्धन पाटील यांच्या प्रयत्नांमुळेच शिवसेना-भाजप सरकारने तावशी पुलासाठी 17 कोटीचा निधी मंजूर केला असून, या पुलासाठी प्रयत्न केलेली तब्बल 3 पत्रे भाजपने दाखवून आ.भरणेंचा दावा खोटा ठरविला. आमदारांनी खोटे श्रेय घेणे आता तरी बंद करावे, असा सल्ला देत इंदापूर तालुका भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस, बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे अभिनंदन केले आहे. शिवसेना-भाजप सरकारच्या कामाचे श्रेय विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराने घेणे हा राज्यातील मोठा विनोद आहे, असा टोला भाजपने लगावला आहे.
राज्यात आता महाविकास आघाडीचे सरकार नसून शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेवर आहे हे तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी झोपेचे सोंग न घेता लक्षात घ्यावे. शिवसेना -भाजपचे सरकार हे गतिमान सरकार असून, इंदापूर तालुक्यातील रस्ते व पुलांच्या कामासाठी कोट्यावधी रुपयांची आर्थिक तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे.
तावशी येथे नीरा नदीवरील पुलासाठी अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पामध्ये 17 कोटीचा निधी मंजूर केला. भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दि. 2 फेब्रु.2023 रोजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना तावशी पुलासह तालुक्यातील 9 पुलांच्या कामास मंजुरी मिळण्यासाठीचे पत्र केले. तसेच हर्षवर्धन पाटील यांनी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना दि. 6 फेब्रु.23 रोजी तावशी पुलासह 9 पुलांच्या मंजुरीसाठी पत्र दिले. सदर पत्रावर बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सचिव (रस्ते)) यांना तात्काळ कारवाई करावी असा आदेश दिला. त्यानुसार राज्य शासनाने तावशी पुलासह इंदापूर तालुक्यातील इतर पुलांच्या कामाला दि.10 फेब्रु.23 रोजी प्रशासकीय मान्यता दिली. यामध्ये तावशी पुलाची प्रशासकीय मान्यता नं. PLN -2023/C. R.447/Plan 3, Dt.10/3/2003. Estimeted Cost Rs.170000 thousand. (रु.17 कोटी ) असा आहे.
भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचे कडेच इंदापूर तालुक्याच्या विकासाची दूरदृष्टी आहे. शिवसेना- भाजप सरकार सत्तेवर असल्याने आता तालुका विकासासाठी निधी कमी पडणार नाही असे भाजपचे तालुकाध्यक्ष अँड. शरद जामदार यांनी सांगितले.
👉 भाजपचे लोकसभा बारामती मिशन…
केंद्र व राज्य भाजपचे बारामती लोकसभा निवडणूक 2024 हे मिशन असून, त्यानुसारच अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात नीरा नदीवरील तावशी पुलासह इंदापूर तालुक्यातील इतर पुलांच्या व अनेक रस्त्यांच्या कामासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, असे भाजपचे इंदापूर तालुकाध्यक्ष अँड.शरद जामदार यांनी सांगितले.