वैभव पाटील :प्रतिनिधी (📲9850868663)
पालघर तालुक्यातील सफाळे पोलीस स्टेशन हद्दीतील सायकल चोरून बोईसर येथे विक्री करणाऱ्या दोन चोरांना स्थानिक पोलीस मित्राच्या साहाय्याने गुरुवार २९ सप्टेंबर रोजी सफाळे पोलिसांनी अटक केली असून यात एका अल्पवयीन मुलाचाही सहभाग आहे. पोलिसांनी आरोपींकडून १ लाख २८ हजारांच्या १३ सायकली हस्तगत केल्या आहेत.
सफाळे पोलीस स्टेशन हद्दीतील देवभूमी हॉल जवळील पार्किंग, रेल्वे स्थानक परिसर अशा विविध भागात विद्यार्थी तसेच दूध विक्रेते आदींच्या पार्क केलेल्या महागड्या सायकली चोरण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांपासून घडत होते. यासंदर्भात, पोलीस मित्र येशू डिमेलो याला परिसरातून सायकल चोरून नेण्याचे प्रकार घडत असल्याची माहिती मिळताच त्याने याबाबत सफाळे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे यांना माहिती दिली. त्यानुसार पोलिसाचे एक विशेष पथक तयार करून रात्रीच्या गस्तीत वाढ करून अखेर गुरुवार २९ सप्टेंबर रोजी पोलिसांनी संतोष नरेश चव्हाण (२० वर्ष ,) सलीम हिताबुद्दीन हाश्मी (१९) दोघेही राहणारे बोईसर, यांना अटक केली. यात एक अल्पवयीन मुलाच सहभाग असून पोलिसांनी त्याला नोटीस बजावली आहे. याप्रकरणी सफाळे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. सदरची कारवाई पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे, उपनिरीक्षक रिजवाना ककेरी आणि प्राजक्ता पाटील, पोलीस कर्मचारी आत्माराम बोरसे, कल्पेश केणी,शिवाजी चिमकर, वैभव सातपुते, नारायण धोंगडे, अनंता खोत, भरत भावर यांनी केली.
Home Uncategorized सफाळे पोलीस स्टेशन हद्दीतील सायकल चोरून बोईसर येथे विक्री करणाऱ्या सराईत सायकल...