शेटफळ हवेली: शेटफळ हवेली येथील ग्रामस्थांच्या वतीने गेल्या २५ वर्षांपासून अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह साजरा करण्यात येतो. याप्रसंगी गावात दरवर्षी उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण असते. अध्यात्म, समाजप्रबोधन आणि एकोपा या उद्देशाने सुरू केलेल्या ग्रामोत्सवाचे हे २६ वे वर्ष होते.भैरवनाथ जन्मोत्सवा निमित्त या सप्ताहाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते.आणि तो अखंडपणे सुरू आहे.सातव्या दिवशी गावातून दिंडीचे (पालखी), तसेच घोड्याचे गोल रिंगण पार पडले,समस्त ग्रामस्थ, महिला, तरुण या दिंडीत विठू नामाच्या गजरात तल्लीन होऊन गेले होते.रात्री ब्रह्मानंद महाराज कुंभार,उपळाईकर यांचे श्री भैरवनाथ जन्माचे किर्तन झाले.भक्ती अशी गोष्ट तीचा विट येत नाही. संसारात काही काही काळ सुख आहे परंतु नंतर विट येतोच. परमार्थात विट येत नाही. संसारात बाप लहान वयात चांगला सांभाळतो, कारण म्हतारपणी मुलगा आपल्याला सांभाळील. संसारात स्वार्थी लोक तर परमार्थात निःस्वार्थी लोक आहेत. खरे प्रेम, सुख परमार्थात आहे. स्वत: आनंद घ्या, दुसर्यालाही द्या, हे परमार्थात आहे.असे अनमोल विचार त्यांनी मांडले.या नंतर श्री नाथजन्मोत्सव व दिमाखदार दिपोत्सव साजरा करण्यात आला.
या सप्ताहाची सांगता ह.भ.प.चैतन्य महाराज देहूकर यांच्या काल्याच्या किर्तनाने झाली.आपल्या अडीच तासांच्या सांगतेच्या काल्याच्या किर्तनात श्रीकृष्णाच्या चरित्रावर महाराजांनी कीर्तन केले. ये दशे चरित्र केले नारायणे। रांगता गोधने राखिताहे॥ या संत तुकाराम महाराजांच्या गौळण निरुपणास घेत त्यावर कीर्तन केले. वारकरी सांप्रदायात काल्याला विशेष महत्त्व आहे. काला हा एकमेकांना वाटून खायचा असतो, जीव ब्रम्ह ऐक्य रुपी काला आहे. भगवान गोकुळात तर संत आपल्यासाठी काला करतात. दुर्जनाचा संहार करण्याकरिता भगवंताचा आवतार असतो. दुसर्याला आनंद देतो त्याला नंद म्हणतात. तर दुसर्याला दु:ख देतो तो कंस! दुसर्याच्या सुखाचा नाश करतो म्हणून भगवंताने कंसाचा नाश केला.संसारातही असा एक वर्ग आहे. त्यांना दुसर्याचे सुख बघवत नाही, दुसर्याच्या सुखाचा नाश करू नये, म्हणून भगवंताने कंसाचा नाश केला. दुसर्याला आनंद देणारांना भगवंताकडे जावे लागत नाही तर भगवंत त्याच्याकडे येतात. भगवंत गोकुळात प्रकट झाले. यश प्रदान करणारी वृत्ती म्हणजे यशोदा! नंद म्हणजे आनंद! जो जगाला देतो. भगवंत गोकुळात प्रकट होतात, त्यानंतर गोकुळात झालेल्या आनंदाचे, शिव आणि विष्णू यांचे मिलनाचा प्रसंग महाराजांनी आपल्या खास शैलीत वर्णन केला.जसे आपण भगवंतावर प्रेम करतो, तसे भगवंत आपल्यावर करतात. गोकुळातील गोपिकांचे प्रेमाचे वर्णन करत महाराज म्हणाले, कृष्णाने चोर्या केल्या नाही तर चौर्य लिला केल्या. चोरी करणे अपराध आहे. चोरी करणारा दंडास पात्र असतो. भगवंताने चौर्य लिला केल्या. लिला या आनंदाकरिता असतात. प्रेमाच्या चोरीत, भांडणातही आनंद असतो. लोणी हे माध्यम आहे. लोण्याप्रमाणे भगवंत भक्ताच्या चित्ताची चोरी करतो.अशा आपल्या खास शैलीत लोकांना त्या काळातील रूढी परंपरा विषयावर किर्तन केले.या वेळी शेटफळ हवेली व पंचक्रोशीतील हजारो भाविकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.काल्याचे किर्तन झाल्यानंतर शेटफळ हवेली ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.सप्ताह यशस्वी होण्यासाठी भैरवनाथ जन्मोत्सव कमिटी व ग्रामस्थ, युवक वर्ग यांनी अथक परिश्रम घेतले.
Home Uncategorized शेटफळ हवेली येथील अखंड हरिनाम सप्ताहाची हजारो ग्रामस्थांच्या उपस्थितीत उत्साहात सांगता.