वारणा कॅन्सर फौंडेशनच्या वतीने तीन कॅन्सरग्रस्तांना आर्थिक मदतीचे वाटप..

कॅन्सर हा दुर्धर आजार असून या आजाराशी दोन हात करीत असताना कॅन्सरग्रस्त कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती खालावत जाते.समाजातील लोकांनी अशा कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा हात देऊन सामाजिक हित जपणं ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन वारणा कॅन्सर फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. अभिजीत जाधव यांनी केले.
वारणा कॅन्सर फौंडेशनच्यावतीने याच सामाजिक भावनेतून आर्थिक विवंचनेत सापडलेल्या आर्थिक दुर्बल अशा कॅन्सरग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदतीचा हात देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यामधे “नो शेव्ह नोव्हेंबर कॅम्पेन फॉर कॅन्सर पेशंट्स” ही आंतरराष्ट्रीय मोहीम राबविल्याची माहिती डॉ.जाधव यांनी दिली.
धीर धरा आणि मनामधे आत्मविश्वास बाळगा,तुम्ही या आजारावर नक्की विजय मिळवाल असा आत्मविश्वास कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि सकाळ वृत्तपत्राचे वारणानगर प्रतिनिधी मा.संजय पाटील यांनी उपस्थितांना दिला.
या मोहिमेस समाजातील 126 दानशूर नागरिकांनी प्रत्येकी शंभर रुपये प्रमाणे या मोहिमेस मदत केली होती.यामधून कु.मंदार सुभाष गुरव वय 24 रा.मौ.सांगाव ता.कागल,श्री.संदीप पोपट लोखंडे वय 44 रा.पाराशरनगर ता.हातकणंगले,कु.गायत्री अभिजीत हवालदार वय 14 रा.चिखली ता.पन्हाळा या तीन कॅन्सरग्रस्तांना पंधरा हजार रूपयांची आर्थिक मदत करण्यात आली.मोहिमेचे हे 12 वे वर्ष असून आत्तापर्यंत 56 कॅन्सरग्रस्तांना आर्थिक मदत करण्यात आलेली आहे.
बहिरेवाडी येथील श्री.महात्मा वाचनालयाच्या सभागृहामधे घेण्यात आलेल्या या कार्यक्रमामधे संघटक राम करे,परशुराम कावळे,सयाजी गुरव,प्रमोद कावळे,श्रीकांत कणसे,लोकमतचे आनंदा वायदंडे,एस न्यूज चे नितीन पाटील,नथुराम तेली,निलेश चव्हाण,अमर माने आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार शिवराज जाधव यांनी मानले.सूत्रसंचालन लखन करे यांनी केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here