रामोशी समाजाला जातीचे दाखले मिळवून देण्यासाठी सहकार्य – हर्षवर्धन पाटील
– शेटफळ पाटी येथे धन्यवाद देवेंद्रजी यात्रा
– उमाजी नाईक यांचा जयंती सोहळा
इंदापूर : रामोशी समाज बांधवांना जातीचे दाखले तात्काळ मिळणेसाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा केली जाईल. तसेच इंदापूर तालुक्यातील रामोशी समाज बांधवांना जातीचे दाखले मिळणेसंदर्भात तहसीलदार, प्रांताधिकारी यांचे समवेत समाज बांधवांची बैठक लावून सहकार्य करू, अशी स्पष्ट ग्वाही भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मंगळवारी (दि.26) दिली.
इंदापूर तालुक्यातील शेटफळ पाटी येथे आशीर्वाद मंगल कार्यालयात जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य आयोजित धन्यवाद देवेंद्रजी यात्रा व उमाजी नाईक जयंती सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून हर्षवर्धन पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्राचे अध्यक्ष दौलतनाना शितोळे हे होते. प्रारंभी हर्षवर्धन पाटील व मान्यवरांच्या हस्ते राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा देणारे राजे उमाजी नाईक हे महाराष्ट्रातील पहिले क्रांतिकारक होते. भिवडी ता.पुरंदर येथे त्यांचे स्मारक उभारणीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 5 कोटी रुपयांच्या निधी दिला आहे. उमाजीराजेंच्या कुटुंबांकडे पुरंदर
किल्ल्याच्या रक्षणाची जबाबदारी होती.
छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांचे आदर्श व स्फूर्तीस्थान होते. राजे उमाजी नाईक यांचा इतिहास अंगावर रोमांच उभा करतो. राजे उमाजी नाईक यांचे देशासाठीचे बलिदान महाराष्ट्र कधी विसणार नाही. त्यांचे नाव इतिहासात अजरामर झाले आहे.कर्मयोगी शंकररावजी पाटील, लोकनेते शहाजीराव पाटील यांचे पासून इंदापूर तालुक्यातील रामोशी समाज बांधव आमचे सोबत एकनिष्ठेने उभा आहे. आम्हीही या समाजाच्या प्रगतीसाठी वेळोवेळी प्रामाणिकपणे सहकार्य केले आहे. इंदापूर शहरात राजे उमाजी नाईक यांचा पुतळा उभारणे संदर्भात सहकार्य केले जाईल,असे त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व भारतीय जनता पार्टीने रामोशी समाजाला न्याय दिला आहे. आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या नावाने रामोशी, बेडर व बेरड समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून 50 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. उमाजी नाईक यांची जयंती शासकीय, निमशासकीय कार्यालयामध्ये साजरी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामोशी, बेडर, बेरड समाजाच्या मागण्या मान्य केल्यामुळे त्यांच्याबद्दल व भाजप बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दौलतनाना शितोळे यांनी काढलेली धन्यवाद देवेंद्रजी यात्रा खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यामुळे रामोशी समाजामध्ये जागृती होत आहे, असे असे गौरवोद्गार यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी काढले.यावेळी बोलताना जय मल्हार संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष दौलतनाना शितोळे यांनी सांगितले की, रामोशी समाजाच्या बहुतांशी मागण्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केल्याने, रामोशी समाज हा भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी एकनिष्ठेने उभा राहिला आहे. त्यासाठी राज्यात धन्यवाद देवेंद्रजी यात्रा सध्या सुरु आहे.प्रास्ताविक दत्तात्रय जाधव यांनी केले. याप्रसंगी शिवधर्म फाउंडेशन महाराष्ट्राचे अध्यक्ष दीपकअण्णा काटे, विष्णू चव्हाण, दीपक बोडरे यांची भाषणे झाली. यावेळी महाराष्ट्र जय मल्हार क्रांती संघटनेचे युवक अध्यक्ष सुधीर नाईक, तानाजी थोरात, हनुमंत शिंदे, नानासो चव्हाण, दादासाहेब घोगरे, सुरेश मेहेर, मनोज जगदाळे, माऊली शिंदे, कल्याण भंडलकर, पांडुरंग जाधव, प्रकाश चव्हाण, रोहित चव्हाण, सतीश चव्हाण, अंकुश चव्हाण, अजय पोळ, शिवाजी माने, सिद्धेश्वर जाधव, अग्नीनाथ चव्हाण, महेश जाधव, विकास शिंदे आदींसह जय मल्हार क्रांती संघटनेचे इंदापूर तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन तसेच आभार बापूराव जाधव यांनी मानले.
दुखापत असूनही हर्षवर्धन पाटील उपस्थित!
भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पायाच्या तळव्याला काही दिवसापूर्वी दुखापत झाली आहे. त्यांना आणखी आठ -पंधरा दिवस विश्रांतीची गरज आहे. असे असताना रामोशी समाज बांधवांच्या प्रेमापोटी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिले, त्याबद्दल यावेळी रामोशी बांधवांनी कृतज्ञता व्यक्त केली.