अवसरी ग्रामविकास प्रतिष्ठान अवसरी आणि शिंगटे हॉस्पिटल अवसरी-इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने श्री हनुमान विद्यालय अवसरी येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेले रक्तदान शिबिर आणि महिलांसाठीचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.प्रारंभी ग्रामदैवत श्री हनुमानाच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय अरुणदादा शिंगटे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध चित्रपट निर्माते व दिग्दर्शक शिवकुमार गुणवरे साहेब हे उपस्थित होते.याचबरोबर कॅमेरामन मिलिंद मखरे, सिद्धेश्वर ब्लड बँक सोलापूरचे डॉ. गगलानी व त्यांचे सहकारी, तसेच भांडगाव येथील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सुभाष गायकवाड सर ,संस्थेच्या मार्गदर्शिका सौ विजया शिंगटे मॅडम,अमित शिंगटे, डॉ धिरज शिंगटे,कर्मयोगी साखर कारखान्याचे संचालक शांतीलाल शिंदे पाटील, डॉ.नागन्नाथ शिंदे पाटील व मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना श्री शिवकुमार गुणवरे यांनी शिक्षण क्षेत्रातील योगदानाबरोबरच रक्तदानासारखे महत्त्वपूर्ण उपक्रम संस्थेच्या वतीने राबवण्यात आल्याबद्दल त्यांनी विशेष कौतुक केले. एक साधा एस.टी वाहक इतकी मोठी संस्था उभा करू शकतो याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले .याचबरोबर विद्यालयातील विविध उपक्रम, विद्यार्थ्यांची शिस्त याबद्दल समाधान व्यक्त करून त्यांच्या जीवनातील काही प्रसंगही यावेळी त्यांनी सांगितले. ते म्हणाले की धन आणि मान यामुळेच अगदी भावाभावातही वितुष्ट येते आणि म्हणून त्यापासून मी नेहमीच अलिप्त राहत आलो आहे. सुरुवातीच्या प्रतिमा पूजनानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.त्यानंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री लोंढे सर यांनी थोडक्यात प्रास्ताविक केले.या रक्तदान शिबिरामध्ये चाळीसहून अधिक व्यक्तींनी रक्तदान केले तर परिसरातील अनेक महिला हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या . त्यांनाही स्वतंत्रपणे श्री गुणवरे यांनी तसेच सौ.बुधावले मॅडम यांनी महिला आरोग्याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित सर्व महिला भगिनींना आणि सर्व रक्तदात्यांना शिंगटे हॉस्पिटलच्या वतीने भेटवस्तू देण्यात आल्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री नाना घळके सर यांनी तर आभारप्रदर्शन अमित शिंगटे यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धेश्वर ब्लड बँक सोलापूरचे डाॅक्टर्स व कर्मचारी ,विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच शिंगटे हॉस्पिटल आणि शिंगटे परिवारातील सर्व सदस्यांसह ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.