मंगळवेढा : आजच्या परिस्थितीत दुधाला दर नाही, ऊसबिले अडकली आहेत, शेतमालाला दर नाहीत,सोयाबीनचे दर कोसळले आहेत,कांद्याचा वांदा झाला आहे,शेतक-याच्या प्रश्नावर आज कोणी बोलायला तयार नाही,त्याची फरफट थांबवायला कोणी तयार नाही.शेतकरी रोज मरतो आहे,आत्महत्या करतो आहे. किडा-मुंगीच्या औकादीने शेतकरी मरतो आहे पण सत्ताधा-यांना जाग येत नाही. बहूतेक शेतकरी नेते सत्तेच्या मागे धावत आहेत. शेतमालाचे भाव कोसळत आहेत. त्यांचा उत्पादनाचा खर्चही निघत नाही. सगळ्या सत्ता, सगळे नेते शेतक-यांचे नाव घेवून मतं घेवून सत्तेत येतात. सत्तेत आले की शेतक-यांना विसरून जातात. शेतक-यांनी पहायचे तरी कुणाच्या तोंडाकडे ? शेतक-यांना वाली कुणी आहे का नाही ? अशी अवस्था आहे. अपवाद वगळता सर्व शेतकरी चळवळ संपली आहे. शेतकरी चळवळ मेली आहे. या मेलेल्या सरकारसह चळवळीचे आम्ही काही दिवसातच श्राध्द घालणार आहोत अशी माहिती मंगळवेढा चे नेते राजकुमार स्वामी यांनी आज दिली.