वैभव पाटील :पालघर जिल्हा प्रतिनिधी
पालघर – भारतीय आरक्षणाचे जनक, मोफत व सक्तीच्या शिक्षणाचे प्रणेते आणि विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा स्मृती शताब्दी सांगता समारंभ शनिवार दि. ६ मे रोजी पालघर येथील भगिनी समाज संस्थेच्या ज्ञानेश्वर सभागृहात प्राथमिक व माध्यमिक विभागाद्वारे साजरा करण्यात आला.यावेळी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका प्रिती वर्तक व माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका प्रणिता वर्तक तसेच ज्येष्ठ शिक्षिका विश्रूती चाबके यांच्या शुभहस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी सांगता समारंभ दिनानिमित्त भगिनी समाजशाळेत विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती. विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे जीवन’ हाविषय दिला होता. स्पर्धेत विजेते ठरलेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे- १) श्रद्धा संदीप पाटील २) काव्या जयेश पाटील ३) वेदांत दिनेश गुंड ४) योगेश्वरी विठ्ठल डवले ५) हर्ष आलेश पवार
या विजेत्या स्पर्धकांना मुख्याध्यापिका व शिक्षकांच्या शुभहस्ते शैक्षणिक साहित्याचे बक्षीस वितरित करण्यात आले. तसेच यावेळी माध्यमिक विभागातील शिक्षिका आशिका घरत यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले. सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राथमिक विभागातील शिक्षक दर्शन भंडारे यांनी केले.