इंदापूर : पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी अनेक लोकोपयोगी असे धाडसी निर्णय घेतले आहेत. परिणामी, आगामी सन 2024 च्या लोकसभा निवडणुकीत देशात भाजप 300 प्लस जागा जिंकणार असून, बारामती लोकसभा मतदारसंघाचा आगामी खासदार भारतीय जनता पार्टीचा असेल, असा विश्वास पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांची बारामती येथे रविवारी (दि.24) व्यक्त केला.
बारामती येथील भाजपच्या पक्ष कार्यालयास अंकिता पाटील ठाकरे यांचा युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रविवारी सत्कार करण्यात आला. सदर प्रसंगी अंकिता पाटील ठाकरे यांनी भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी पक्ष विस्तार व इतर विषयांवरती संवाद साधला. सदर प्रसंगी पत्रकारांशी बोलताना अंकिता पाटील ठाकरे यांनी विविध विषयांवर संवादही साधला.
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे नेतृत्वा खालील केंद्रातील भाजपचे सरकार हे सलग तिसऱ्यांदा 2024 मध्ये देशात सत्तेवर येणार आहे. राज्यातही महायुतीचे सरकार चांगले काम करीत आहे. त्याचा फायदा ही लोकसभा निवडणुकीत होणार असल्याचे यावेळी अंकिता पाटील ठाकरे यांनी नमूद केले..