👉 पतंजली योग परिवार व संजीवन योग संस्थेचा उपक्रम : मागील अठरा वर्षांपासून अखंडपणे मोफत योग वर्ग सुरू
इंदापूर : पतंजली योग परिवार व संजीवन योग संस्था यांच्या योग प्राणायाम स्थायीकेंद्राच्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्ताने शहा ब्रदर्स अँड कंपनी यांच्या सौजन्याने, योगगुरू दत्तात्रय अनपट यांच्या मार्गदर्शनाखाली पाच दिवशीय मोफत योग शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती, पतंजली योग परिवाराचे योगसाधक विलास गाढवे, जितेंद्र माने यांनी दिली.इंदापूर शहरातील शहा सांस्कृतिक भवन येथे सोमवार दि. ५ डिसेंबर ते शुक्रवार दि. ९ डिसेंबर पर्यंत दररोज पहाटे ५ ते ७.१५ वाजेपर्यंत मोफत योग प्राणायाम शिबिर घेतले जाणार आहे. इंदापूरच्या योगशिक्षक व योग साधकांनी मागील १८ वर्षांपासून इंदापूर शहरात अखंडपणे योग प्राणायम स्थायी केंद्र मोफत सुरू ठेवले आहे.या केंद्रामध्ये आतापर्यंत लाखो लोकांनी लाभ घेतला आहे. मधुमेह, रक्तदाब, दमा, स्थुलपणा, त्वचाविकार, गुडघेदुखी, सांधेदुखी, संधीवात, मणक्याचे आजार, अर्धांगवायु, मुळव्याध, वंध्यत्वविकार कर्करोग, मानसिक ताण तणाव अशा अनेक शारीरिक व मानसिक विकारांपासून अनेकांना मुक्ती मिळालेली आहे. तसेच पतंजली योग परिवार व संजीवन योग सेवा संस्थेमार्फत अनेक समाजउपयोगी उपक्रम राबवले जातात.गरजु विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे, मुलांच्या योगासन, सुर्यनमस्कार स्पर्धा घेणे लहान मुले व युवक हे देशाचे भावी आधारस्तंभ आहेत, त्यांच्यावरती चांगले संस्कार होऊन त्यांच्यामध्ये व्यायामाची योग प्राणायामाची आवड निर्माण व्हावी. शारिरीक, मानसिक व बौध्दीक दृष्ट्या सुदृढ होऊन ते देशाचे सुजान व बलशाली नागरीक व्हावेत,यासाठी बाल योग संस्कार केंद्र सुरू ठेवले आहे.पाच दिवशीय मोफत योग प्राणायम शिबिरामध्ये जेष्ठ योग शिक्षक अनंत झांबरे, योगप्राणायाम व आयुर्वेद यावर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच योगाचार्य विकास राणाजी यांचे सर्व रोग निवारण उपचार पद्धती यावर मार्गदर्शन होणार आहे. जेष्ठ योग शिक्षक हनुमंत साळुंखे यांचे योग प्राणायाम व घरगुती उपचार पद्धती यावर मार्गदर्शन होणार असून, शिबिराची सांगता कामधेनु सेवा परिवाराचे अध्यक्ष समाजभूषण डॉ. लक्ष्मण आसबे यांचे ‘योगाचे अंतिम साध्य’ या विषयावर व्याख्यानाने होणार आहे.तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन इंदापूर पतंजली योग परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
Home Uncategorized पतंजली योग परिवार व संजीवन योग संस्थेमार्फत योगगुरू दत्तात्रय अनपट यांच्या मार्गदर्शनाखाली...