निवडणुकांमध्ये पुन्हा ओबीसी आरक्षण हे युती सरकारचे यश – हर्षवर्धन पाटील

इंदापूर:सर्वोच्च न्यायालयाचा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणास पुन्हा मंजुरी देण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये पुन्हा ओबीसी आरक्षण लागू होणे हे युती सरकारचे यश आहे, असे प्रतिपादन भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी (दि.20) केले.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसींना पुन्हा राजकीय आरक्षण मिळवून देणार! असा शब्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे दिला होता. सन 2020 मध्ये ओबीसी समाजाचे स्वराज्य संस्था निवडणुकांमधील राजकीय आरक्षण स्थगित झाले होते. त्यानंतर 2 वर्षे तात्कालीन सत्तारूढ महाविकास आघाडी सरकारने ओबीसींना राजकीय आरक्षण देणे संदर्भात वेळकाढूपणा केला. मात्र राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार बदलून भाजप-शिवसेना युतीचे सरकार सत्तेवर आले.परिणामी शासकीय व्यवस्थेची कार्यपध्दतीही बदलली व सर्वोच्य न्यायालयातील आरक्षणासंदर्भातील मांडणीत सुसूत्रता आली आणि ओबीसी समाजास स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये 27 टक्केपर्यंत राजकीय आरक्षण पुन्हा लागू झाले. त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हर्षवर्धन पाटील यांनी आभार व्यक्त केले. आता ओबीसी आरक्षणासह नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती या निवडणुका होणार असून, दोन आठवड्यांमध्ये निवडणूक कार्यक्रम घोषित करण्याच्या सूचनाही सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाल्याचे यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here