निलेश भोंग : इंदापूर तालुका प्रतिनिधी.
जिल्हाधिकारी यांनी दिले आठवडे बाजार चालू करण्याची परवानगी
निमगाव केतकी: दीड वर्षापासून कोरोना संसर्गामुळे बंद असणारा निमगांव केतकी येथील आठवडे बाजार दि.23 ऑक्टोबर रोजी पासून अखेर चालू करण्यात आला. ग्रामपंचायतीच्या वतीने काल आठवडे बाजार चालू करण्यासंदर्भात सांगण्यात आले तसेच आजूबाजूच्या गावातील लोकांना कळण्यासाठी गाडीने पुकारून सांगण्यात आले. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार 23 ऑक्टोबर पासून बाजार सुरू करण्याची परवानगी मिळत असल्याने आठवडे बाजार चालू करण्यात आला. यापूर्वीही अनेक सामाजिक कार्यकर्ते यांनी शासनदरबारी आठवडे बाजार सुरू करण्यासंदर्भात पाठपुरावा केलेला होता. त्यांच्या मागणीला यश येऊन अखेर आठवडे बाजार चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा बाजार चालू होत असताना शेतकऱ्यांकडून तसेच खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्याचे आव्हान प्रशासनाच्या वतीने घेण्याचे सांगण्यात आले आहे.
निमगाव केतकी आठवडे बाजारावर तालुक्यातील काटी, वरकुटे, पिटकेश्वर, सराफवाडी, वांगी, निमसाखर, व्याहाळी, कौठळी तसेच निमगाव केतकी परिसरातील अनेक छोट्या-मोठ्या वाड्या-वस्त्या अवलंबून असतात. आठ महिन्यापासून आठवडे बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होत होते, त्यामुळे शेतकऱ्यांचा शेतमाल कवडीमोल भावाने व्यापाऱ्यांच्या घशात घालावा लागत होता. आठवडा बाजार चालू झालेने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.