वैभव पाटील :पालघर जिल्हा प्रतिनिधी
सफाळे पश्चिमेस तीन कि.मी. अंतरावर असलेल्या मांडे- विठ्ठलवाडी ग्रुप ग्रामपंचायतींच्या सरपंच पदी ५० वर्षांच्या प्रत्यक्षेनंतर विठ्ठलवाडी गावचे महेंद्र पाटील सर विराजमान झालेले आहेत. गेली वीस वर्ष गावाच्या विकासाच्या दृष्टीने झटणारे महेंद्र सर हे दोन वेळा उपसरपंच तर दोन वेळा सदस्य म्हणून ग्रामपंचायत वर कार्यरत होते.
मांडे ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीत एकूण पाच उमेदवार रिंगणात उतरले होते त्यापैकी माजी सरपंच प्रियंका (मिताली) गिरणे व माजी सरपंच शितल पाटील यांच्यावर मात करून परिवर्तन पॅनलचे महेंद्र पाटील यांनी ५८ मतांनी विजय संपादन केला. त्याचबरोबर पॅनलचे सदस्य श्रीधर म्हात्रे, मनीषा पाटील, किशोर गिरणे व रेखा भोईर हे उमेदवार बहुमतांनी निवडून आले. तर जनमत आघाडीचे निलेश भोणे हे बिनविरोध निवडून आले असून हर्षद भोईर, पूजा जाधव, प्रणाली भोपी व कल्पिता शेलार हे उमेदवार विजयी झाले. सरपंच पदासाठी निवडणूक लढविणारे ग्रामविकास आघाडीचे उमेदवार नितेश पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला तर विकास पाडेकर यांनी निवडणुकीपूर्वीच माघार पत्करली.