जूनी पेन्शनसाठी निघणार ” पेन्शन संघर्ष यात्रा ” ! २४ नोव्हेंबर पुण्यात दाखल होणार !

पुणे प्रतिनिधी:  राज्य शासनात १ नोव्हेंबर २००५ पासून सेवेत लागलेल्या शासकीय , निमशासकीय शिक्षक , प्राध्यापक , तलाठी, ग्रामसेवक, लिपिकवर्गीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी नवीन पेन्शन योजनेला कडाडून विरोध करत सरकारविरोधात पुन्हा एल्गार पुकारला आहे.जुन्या पेन्शन योजनेची मागणी करत शासकीय कर्मचाऱ्यांनी २२ नोव्हेंबरपासून राज्यभर पेन्शन संघर्ष यात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मेटाकुटीला आलेल्या सरकारची डोकेदुखी या नव्या आंदोलनाने आणखी वाढणार आहे.जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समितीचे संयोजक वितेश खांडेकर यांनी सांगितले की, नव्या पेन्शन योजनेला असलेला विरोध आणि जुन्या पेन्शन योजनेची गरज याबाबत जनजागृती करण्यासाठी २२ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर या काळात राज्यातील मुंबई ते वर्धा अशा सर्व ३६ जिल्ह्यांत पेन्शन संघर्ष यात्रा काढली जाईल. आझाद मैदान येथून जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समितीमधील सर्व संघटनांचे पदाधिकारी मुख्यमंत्र्यांसह वित्तमंत्र्यांना निवेदन देऊन पेन्शन संघर्ष यात्रेची सुरुवात करतील. पेन्शन संघर्ष यात्रा राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून जनजागृती केल्यानंतर ७ डिसेंबरला वर्ध्यातील सेवाग्राम येथे समारोप होईल, प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यापर्यंत पोहचून या बाबत अधिकची जागृती आम्ही करणार आहोत, असे संघटनेचे महासचिव गोविंद उगले यांनी सांगितले आहे.

पेन्शन संघर्ष यात्रा दि. २४ नोव्हेंबर २०२१ रोजी पुणे येथे दाखल होणार आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व शिक्षक व कर्मचारी संघटनांचा मेळावा होणार आहे, पेन्शन संघर्ष यात्रा यशस्वी होण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करणार आहोत असे पुणे जिल्हाध्यक्ष श्री. संतोष गदादे यांनी सांगितले.महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना या आंदोलनाचे संयोजक आहे. संघटनेचे कार्याध्यक्ष प्राजक्त झावरे-पाटील यांनी सांगितले की, राज्यातील शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांसह शिक्षक, प्राध्यापक, तलाठी, ग्रामसेवक, लिपिक, चतुर्थश्रेणी अशा सर्व प्रकारातील संघटनांनी संघर्ष समन्वय समितीमध्ये भाग घेतला आहे. त्यामुळे ही संघर्ष यात्रा अधिकारी – कर्मचारी संघटनेसाठी एक नवा अध्याय असेल.संघर्ष यात्रेनंतर विधानभवनावर धडक मोर्चा काढण्यात येणार असून त्याचेही सूक्ष्म नियोजन अंतिम टप्प्यात असल्याचे कार्याध्यक्ष आशुतोष चौधरी यांनी सांगितले. तरी सर्वांनी आपल्या जिल्ह्यासह संघर्ष यात्रेनंतर होणाऱ्या पेन्शन मार्च साठी जल्लोषात सहभागी होण्याचे आवाहन कोषाध्यक्ष प्रविण बडे, सल्लागार सुनिल दुधे, मनीषा मडावी यांच्यासह सर्व विश्वस्त, राज्य पदाधिकारी यांनी केले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here