घे ग तू भरारी…..लेखक- सौ.अनुराधा अमर फडतरे
जागतिक महिला दिन हा महिलांचा दिवस आहे म्हणजे जगाच्या निम्म्या लोकसंख्येचा दिवस आहे. लोकसंख्येचा दिवस आहे म्हटल्याने त्याचे महत्त्व लक्षात येणार नाही. ज्या लोकसंख्येचा हा दिवस आहे ती लोकसंख्या उपेक्षित लोकसंख्या आहे. एवढे सांगितल्यास या दिवसाचे महत्त्व लक्षात येईल. पण त्यातल्या त्यात महत्त्वाची गोष्ट अशी की, ही लोकसंख्या तिच्यात कर्तबगारीची धमक असून सुद्धा उपेक्षित आहे. या महिलांना हा समाज संधी देत नाही आणि ज्या क्षेत्रात महिलांना संधी दिली आहे त्या-त्या क्षेत्रात महिलांनी कामगिरी दाखवली आहे. महिलांमध्ये मुळातच जीवनाचे गांभीर्य जास्त असते. परंपरेने, धर्माने, रूढीने आणि समाजाच्या पुरुष प्रधान वागणुकीमुळे आणि मानवता अशी उपेक्षित राहिलेली आहे. तरीही मानवप्राणी स्वतःला प्रगत समजतो ही खरी दुर्दैवाची बाब आहे
स्त्रीला समाजाने आपला असे गोंडस नाव दिले आहे. पण ती अबला नसून सबला आहे. ती महान शक्ती आहे.महिला म्हणजे महिषासुरमर्दिनी आहे. स्त्री अन्याय सहन करते, ही स्त्रीचीच मोठी चूक आहे. छळ, आत्याचार यांच्या ओझ्याखाली स्त्री जीवनातील हास्य हिरावून त्या अबलेची चक्र व्यूहात अडकलेल्या अभिमन्यू सारखी अवस्था झाली आहे.आत्ताच्या या काळामध्ये सुद्धा कितीतरी कुटुंबामध्ये स्त्रीवर अन्याय होताना दिसतो. तरी शांत राहते. कारण कुटुंब उध्वस्त होईल. स्त्री स्वतावर होणारा अन्याय सहन करते. हा होणारा अन्याय शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारचा असतो. स्त्रीने या अन्यायाला विरोध करायचा म्हटलं तर 90 टक्के लोकांची कुटुंबे उद्ध्वस्त होतील. ही अवस्था आजच्या स्त्रीची आहे.तथापि समाजामध्ये बदल होणे आवश्यक आहे. कारण आपण सर्व माणसे आहोत त्याच प्रमाणे समान हक्क आणि समान संधी सर्वांना मिळाल्या पाहिजेत. मागील काही वर्षाचा आलेख पाहिला तर स्त्रियांनी अनेक क्षेत्रामध्ये विलक्षण कामगिरी केली आहे. कारण तिच्यामध्ये सुप्त गुण आहेत अगदी पुरुषांच्या तुलनेत जास्त म्हटलं तरी अवग ठरणार नाही. याची उदाहरणे तुम्हाला माहीतच आहेत हिरकणी कडा उतरून खाली आली, श्री ममतेचा झरा आहे. झाशीच्या राणीने तर बाळ पाठीवर बांधून लढाई खेळली. जिजाऊंनी तर स्वराज्याला संस्कार दिले, छत्रपती शिवाजी महाराज सारखे युगपुरुष दिले. सिंधुताई सपकळ स्वता वरील अन्याय बाजूला ठेवून हजारोंच्या माता बनल्या. त्यांनी अश्रूंनाही दरडावून सांगितले.
डोळ्यातील आसवांनो वाहू नका
अंतरीच्या वेदनांना जागा देऊ नका
म्हणून मी म्हणते स्वप्न बघा आणि ते खरे करा तुमच्यामध्ये ती ताकत आहे. तुमच्यातील गुण ओळखा. जिजाऊ सारखी माता बना तुमच्या मुलीच्या मागे खंबीर उभे रहा. हुंडा विरोधात, स्त्री भून हत्या विरोधात मोठे पाऊल उचला, स्वतःची किंमत ओळखा, संभाव्य त़ेनुसार उद्दिष्टे साध्य करा. जर लोकांना जागे करायचे असेल तर महिला वर्गांनी जागृत असणे गरजेचे आहे. नवीन काहीतरी निर्माण करावे, नवीन गोष्टी साध्य करण्याची धमक स्त्रीमध्ये आहे. एका स्त्रीने दुसऱ्या स्त्री ची मैत्रीण व्हावे मना शिखरे राहावे. आणि हे सगळं करत असताना तिने स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. कारण हे सगळं सांभाळत असताना तिच्याकडे एक महत्त्वाची कामगिरी देवाने तिला देणगी म्हणून दिलेली आहे म्हणजे एका नवीन जीवाला जन्म द्यायचा त्याचे पालन पोषण करायचे, त्यातही ती नोकरी करत असेल नोकरीही सांभाळायची आणि अजून इतर कामे त्यामुळे तिच्या शरीराची झीज होऊन जाते. त्यामुळे तिने स्वतःच्या आरोग्याकडे जास्त लक्ष दिले पाहिजे दररोज न चुकता अर्धा तास तरी व्यायाम केला पाहिजे. स्त्री जर शारीरिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या कणखर बनली तर ती उंच शिखर गाठ होऊ शकते आणि एक दिवस असा येवो की महिला दिन साजरा करण्याची गरज वाटायला नको. हे कधी शक्य होईल ज्यावेळेस स्त्री व पुरुष यांनी एक समान भूमिका घेऊन सामाजिक जागृती केली तर. त्यासाठी सामाजिक समाजाची मानसिकता बदलायला हवी व सामाजिक परिवर्तनाचे पहिले पाऊल कुटुंबापासून उचलले पाहिजे. स्त्री पुरुष समानता म्हणजे स्त्री विरुद्ध पुरुष असा संघर्ष नाही ,असे आक्रमण नाही, तर कुटुंबातील सदस्यांच्या परस्पर समन्वयाची सामंजस्याची भूमिका हा अर्थ त्यातून अभिप्रेत आहे. आणि एकदा का स्त्रीला समान हक्क मिळाला, समान वागणूक मिळाली तर स्त्री वर होणारे अत्याचार, तिच्यावर होणारा अन्याय, तिच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन हा पुरुष प्रधान संस्कृती चा नक्कीच बदलेल आणि एका नवीन संस्कृतीचा उदय होण्यास सुरुवात होईल.
स्त्रीशक्ती तू
प्रेमाची अन त्यागाची
सुंदर दिव्य मूर्ती तू
कर्तबगारीने इतिहास सजला
देते सदैव स्फूर्ती तू
माया ममता तुझी सावली
जन्म देणारी आई तू
सुखदुःखात होशी सोबती
कधी बहीण तर कधी सखी तू
कधी होशील कधी कणखर
लेक सावित्रीची शोभे तु
जिजाऊंची वारस अन्
हिरकणी चे धाडस तू
तू अचाट शौर्याची गाथा
पराक्रमाची कहानी तू
प्राणपणाने लढणारी
झाशीची रणरागिनी तू
जगी होई सन्मान तुझा
कार्यातून दिसतेस तू
घर स्वर्गाहून सुंदर ते
ज्या घरात हसतेस तू