इंदापूर – प्रतिनिधी
खासदार सुप्रिया सुळे व इंदापूर तालुक्याचे युवा नेते राजवर्धन पाटील यांच्या भेटीने व चर्चेने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मुंबईमध्ये एका लग्न समारंभामध्ये मंगळवारी ही भेट झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.आगामी विधानसभा निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने हर्षवर्धन पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केल्याचे दिसत आहे. इंदापूर विधानसभेची जागा ही महायुतीमध्ये स्टॅंडिंग आमदार या निकषानुसार विद्यमान आमदारांकडे जाईल असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांनी विधानसभा निवडणूक हर्षवर्धन पाटील लढविणार, जिंकणार व गुलाल आमचाच!! अशी बॅनरबाजी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवरती खा. सुप्रिया सुळे व राजवर्धन पाटील यांच्या भेटीने, विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार) पक्ष हा हर्षवर्धन पाटील यांना मदत करणार का, अशी चर्चा इंदापूर तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये सध्या सुरू झाली आहे.
•चौकट :
पवार साहेब हर्षवर्धन पाटलांना सहकार्य करणार?
जेष्ठ नेते शरद पवार व हर्षवर्धन पाटील यांचे असलेले चांगले व्यक्तिगत संबंध राज्याला माहित आहेत. त्यातच खा. सुप्रिया सुळे व राजवर्धन पाटील यांच्या झालेले भेटीने पवारसाहेब हे इंदापूर विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांना सहकार्य करणार का, अशीही चर्चा सुरू झाली आहे.