कोट्यावधीचा निधी मिळूनही रस्त्याचे काम अपूर्ण का? निमगावकरांचा सवाल.खड्ड्यांमुळे अपघात होण्याची भीती.

👉 सार्वजनिक बांधकाम विभागाचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर
उपसंपादक निलकंठ भोंग:
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लोणी देवकर – निमगांव केतकी- रामकुंड – शेटफळ हवेली हा आठ कोटी रुपयांचा रस्ता मंजूर होऊन त्याचे कामही बऱ्यापैकी पूर्णत्वास आले. परंतु निमगाव केतकी येथील व्याहळी चौक ते म्हेत्रेवस्ती रस्त्याचे काम झाले नसून या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले असून या रस्त्याने जाताना नागरिकांना कसरत करावी लागत आहे. त्यात पावसाळा चालू असल्याने खड्ड्यांमध्ये पाणी साचून खड्ड्यांचा अंदाज लावता येत नसल्याने अपघात होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.या रस्त्यावरून आसपासच्या वाडीवस्त्यावरून तसेच लोणी देवकर, व्याहाळी, कौठळी, कडबनवाडी या ठिकाणहूनही लोक येत असतात. त्याचबरोबर विद्यार्थीही शाळेसाठी येत असल्याने त्यांची गैरसोय होत आहे. या रस्त्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मिळाला असताना देखील या रस्त्याचे काम अपूर्ण कसे असा सवाल नागरिक करू लागले आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अन्यथा दि.१६ जुलै रोजी रस्ता रोको करण्याचा इशारा मा. उपसरपंच तुषार जाधव यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत सदस्या रिना सुभाष भोंग, सचिन जाधव मा. ग्रामपंचायत सदस्य माणिक भोंग, ॲड सुभाष भोंग यांनी दिला आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here