अरबी काल गणनेतील शेवटच्या जिलहज्ज या अरबी महिन्यात जगभरातील कोट्यवधी मुस्लिम कुर्बानी करतात. कुर्बानी म्हणजे त्याग, आत्मसमर्पण. ही कुर्बानी केवळ एक प्रथा नसून, आत्मसमर्पपणाची प्रेरणा देणारा महान उत्सव आहे. असा उत्सव जो वंदनीय विश्व निर्मात्या समोर नतमस्तक होण्याची आणि वेळ प्रसंगी वाट्टेल त्या गोष्टीचा त्याग करण्याची प्रेरणा देतो. समाजातील अनिष्ट चालीरिती, वाईट रूढी परंपरा नष्ट करण्याकामी ईश्वरीय आदेशानुसार चळवळ चालवून समाज प्रबोधनाचे महान कार्य करणाऱ्या पैगंबर इब्राहिम आणि पैगंबर इस्माईल यांच्या त्यागाच्या अविस्मरणीय आठवणींना पुनरुज्जीवित करण्याचा हा सण. समाज परिवर्तनाच्या चळवळीत आपल्या पोटच्या गोळ्याला कुर्बान करण्यासाठी तयार झालेल्या आणि स्वतःला कुर्बान करण्यासाठी क्षणात हो म्हटलेल्या पैगंबर बाप लेकाच्या आठवणींना उजाळा देणारा हा उत्सव. या उत्सवाला धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक पैलू जुडलेले आहेत.
१४ वर्ष वनवासाला न जाता प्रतिकात्मक स्वरूपात दीप प्रज्वलित करून श्रीरामजींचा वनवास संपल्याचा आनंद आपण दरवर्षी दीपावलीच्या माध्यमातून साजरा करतो. तर स्वतःच्या मुलीला दहन न करता प्रतिकात्मक स्वरूपातील होळी भोवती ओरडत होलिकाला जिवंत जाळण्याचा आपण निषेध करतो. अगदी अशाच प्रकारे पैगंबर इब्राहिम यांनी ईश्वराच्या आज्ञेला समर्पित होत स्वतःचा मुलगा कुर्बान करण्याचा आणि ईश्वराच्या प्रसन्नतेसाठी वडिलांच्या हाकेला ओ देत चक्क मृत्यूला कवटाळण्यासाठी तयार होणाऱ्या पैगंबर इस्माईल यांच्याविषयी असणारी कृतज्ञता आणि ईश्वरावरील श्रद्धा जगभरातील मुस्लिम दरवर्षी प्रतीकात्मक स्वरुपात प्राण्यांची कुर्बानी देऊन व्यक्त करत असतात.
खरं तर ‘जिओ जीवष्य जीवनम’ हा सृष्टीचा नियम आहे. त्यामुळे प्राण्यांची कुर्बानी ही सृष्टी नियमांच्या अनुकूलच आहे. माणूस हा केवळ शाकाहारी किंवा मांसाहारी नसून, तो मिश्रहारी प्राणी आहे. भारतासह जगभरातील माणसांची मोठी संख्या (१००० मागे ९५०) मांसाहारी आहे. जगभरातील ७०० कोटी मांसाहारींची गरज भागवण्यासाठी ७० कोटी प्राण्यांची कत्तल केली जाते. त्यामुळे कुर्बानीला विरोध करण्याचा नैतिक अधिकार कोणालाच नाही. माणसाची शारीरिक संरचना देखील याला अनुरूप अशीच आहे. आधुनिक विज्ञानाने झाडे, पाले, भाज्या ह्या देखील सजीव असल्याचे सिद्ध केल्याचे वेगळे सांगण्याची गरज नाही. शेतातील पीक जोपासत असताना कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणावर वापर करून शेतकरी कळत नकळत करोडो कीटक, जीव जंतू मारत असतो. हेच प्रयोग आपल्या घरातही चालू असतात. कोषात गेलेल्या आळीला उकळत्या पाण्यात ठार मारूनच रेशीम बनवले जाते. त्यामुळे जीवहत्या, पशुदया, मांसाहार पाप वगैरे वगैरे विषयांवर चर्चा आता निरर्थक झाली आहे. कोणाला शाकाहारी राहायचेच असेल तर तो त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे.
लेखक: समीर सय्यद,पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते,इंदापूर
Home ताज्या-घडामोडी कुर्बानी – धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक पैलू जोडलेला अनोखा उपक्रम याकडे...