वैभव पाटील :पालघर जिल्हा प्रतिनिधी
देवभूमी सभागृह सफाळे येथे २४ ऑगस्ट रोजी झालेल्या गणेशोत्सव सभेत मार्गदर्शन करताना उपविभागीय पोलीस अधिकारी मा. नीता पाडवी मॅडम यांनी सांगितले की अदृश्य विषाणूला झुंज देत यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होणार आहे.तरी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी आपल्या अधिकाराबरोबर कर्तव्याची जाणीव ठेवावी. श्री गणेशाचा हा पावन पवित्र सोहळा त्याच्या आगमनापासून विसर्जनापर्यंत कायदा आणि सुव्यवस्थेला धक्का पोहोचणार नाही याची दक्षता घेत साजरा करावा.तसेच कोणत्याही प्रकारचा अपघात घडू नये अथवा मूर्तीची विटंबना होऊ नये या दृष्टीने प्रत्येक मंडळाने चोवीस तास श्री मूर्ती स्थळी पावित्र्य राखावे. सांस्कृतिक कार्यक्रमातून कोणाच्याही भावना दुखावणार नाही तसेच धार्मिक तेढ निर्माण होणार नाही याकरिता प्रत्येक गणेश मंडळाने जागृत राहून हा सोहळा आनंदाने पार पडावा.
सभेस सफाळा पोलीस स्टेशन हद्दीतील सरपंच, उपसरपंच, सार्वजनिक गणेश मंडळे, पोलीस पाटील, ज्येष्ठ नागरिक कार्यकर्ते, शांतता समिती सदस्य, महिला दक्षता समितीचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र पाटील यांनी केले तर जगदीश किणी यांनी उपस्थितांचे आभार मानले.