बीड : पाणीटंचाई हाच शेती व्यवसयातील मुख्य अडसर आहे. शेतकऱ्यांची कष्ट करायची तयारी आहे. वेळप्रसंगी आता पीक पध्दतीमध्येही बदल घडत आहे.सर्व असले तरी केवळ पाण्यावाचून क्षेत्र पडीक पडलेले आहे. मात्र, शेतकऱ्याने मनावर घेतले तर काय करु शकतो हे बीड जिल्ह्यातील पाडळसिंगीच्या मारोतीराव बजगुडे यांनी दाखवून दिले आहे.पाणी टंचाईवर मात करण्यासाठी 30बाय40 अशा आकाराचे शेततळे उभे केल्याचे तुम्ही ऐकले असेल. पण या बहाद्दराने तब्बल एक एकराच्या परिसरातच विहीर खोदली आहे ती ही पाच परस. दररोज 80 मजूर, 12 हायवा, 8 जेसीबी अशा यंत्रसामुग्रीसह तीन वर्षे ही विहीर तयार करण्यासाठी कालावधी लागला. आता विहीरीचे काम पूर्ण झाले असून एक एकर असलेल्या विहीरीच्या परिघाला सिमेंट बांधकाम करुन घेण्यात आले आहे. या विहीरीमुळे बजगुडे यांचा पाण्याचा प्रश्न तर मिटला आहे पण परिसरातील नागरिकांसाठी ही पर्यटनाचे स्थळ बनली आहे. विहीर पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.
👉 शेतकऱ्याचा नेमका उद्देश काय?
गेवराई तालुक्यातील पाडळसिंगी येथील शेतकरी मारोतीराव नारायण बजगुडे यांची 12 एकर शेती आहे. सोबतच त्यांचा मंडपाचा व्यवसाय असून सतत दुष्काळी परिस्थितीमुळे उत्पन्नात घट होत असल्याने बारामाही पाणी पुरेल अशी काही तरी योजना आखण्याचे त्यांच्या डोक्यात आले. शेततळ्याचा विचार केला मात्र त्यामध्ये मर्यादीत पाणीसाठा राहणार असल्याने त्यानी तो विचारही सोडून दिला आणि एक एकरात विहीर करण्याचे त्यांनी ठरविले. तीन वर्षांपूर्वी ही विहीर खोदण्यासाठी सुरूवात केली होती आता कुठे याचे काम पूर्ण झाले असून आता उर्वरीत 11 एकरावरील सिंचनाचा विषय मिटला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
👉 2 कोटीचा खर्च अन् 10 कोटी लिटर क्षमता
एक एकरातील विहीरीचे काम पूर्ण होण्यासाठी तब्बल तीन वर्षाचा कालावधी लागलेला आहे. या दरम्यानच्या काळात बजगुडे यांच्या शेतामध्ये 80 मजूर, 12 हायवा, 8 जेसीबी अशा यंत्रसामुग्रीसह मोठा लवाजमा होता. अखेर पाच परस खोली आणि एक एकराचा परिघ पूर्ण झाल्यावरच त्यांनी काम थांबवलेले आहे. याकरिता बजगुडे यांना 2 कोटींचा खर्च आला असून या विहीरीमध्ये 10 कोटी लिटर पाण्याची साठवणूक होत आहे. त्यामुळे त्यांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. शेततळ्यातील पाणी हे मर्यादित राहणार म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला आणि पूर्णही केला.
👉 आता भरघोस उत्पादन.
या आवढव्य विहीरीमध्ये दोन बोअर घेण्यात आले असून दोन परस खोल्या गेल्यानंतर पाषाण लागला होता. जिलेटिंग सहाय्याने तो फोडून विहीर साडेपाच परस खोल घेण्यात आली. दोन वर्षे पाऊस पडला नाही तरीही या विहीरीतील पाण्यातून ५० एकर जमिनी भीजू शकते. त्यामुळे उत्पादनाचे योग्य नियोजन केले असून 8 एकरमध्ये मोसंबीची लागवड केली आहे. तसेच या विहीरीमध्ये माशांचे बीजारोपण करण्यात आले असून या माध्यमातून उत्पन्न वाढविण्यासाठी ते प्रयत्न करणार असल्याचे मारोतीराव बजगुडे यांनी सांगितले आहे. या विहीरीमुळे भविष्यातील शेतीच्या पाण्याची चिंता दूर झाली आहे.