👉 चालू हंगामात 5100 मजुरांची आरोग्य तपासणी
इंदापूर : ऊस तोडणी चालु असताना थेट ऊसाच्या फडामध्ये जाऊन ऊस तोडणी मजूरांची आरोग्य तपासणी व जागेवरती मोफत औषधोपचाराचा इंदापूर पॅटर्न हा आगामी काळात निश्चितपणे राज्यभर राबविला जाईल, असे गौरवोद्गार राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी (दि.13) काढले.
बावडा येथे ऊसाच्या फडामध्ये आयोजित ऊस तोडणी मजुरांच्या आरोग्य तपासणी शिबिरात हर्षवर्धन पाटील यांनी मार्गदर्शन केले. ऊस उत्पादक शेतकरी वसंत शेंडगे यांच्या तोड चालु असलेल्या ऊस शेतात हा कार्यक्रम झाला.हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, शंकररावजी पाटील चारिटेबल ट्रस्टच्या शंकररावजी पाटील आरोग्य केंद्राच्या गेली 2 वर्षे चालु असलेल्या उपक्रमाचे अतिशय चांगले फायदे दिसून येत आहेत. कर्मयोगी शंकररावजी पाटील व नीरा भीमा कारखाना या दोन कारखान्याच्या कार्यक्षेत्रात राबविला जात असणारा हा समाजोपयोगी उपक्रम राज्यातील सर्व साखर कारखान्यांनी राबवण्यासाठी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचेशी चर्चा झाली आहे. या अनोख्या उपक्रमाचे शासनाच्या मंत्री समितीसमोर सादरीकरण केले जाणार आहे. या शिबिरातून किरकोळ आजारांवरती जागेवरच मोफत औषधे दिली जात आहेत तर गंभीर आजार सापडणाऱ्या ऊसतोडणी मजुरांवर परिसरातील दवाखान्यामध्ये डॉक्टरांच्या सहकार्याने पुढील उपचार केले जात आहेत. शंकररावजी पाटील चारिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा पद्माताई भोसले यांच्या कल्पकतेतून हा उपक्रम यशस्वीपणे राबविला जात आहे. कर्मयोगी व नीरा-भीमा कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात चालू हंगामामध्ये आजपर्यंत सुमारे 5100 ऊस तोडणी मजुरांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. मजुरांना नामांकित कंपनीची औषधे पुरविली जात आहेत. हंगाम चालू असेपर्यंत आरोग्य शिबिराचा उपक्रम चालू राहील, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. प्रास्ताविक महादेव चव्हाण यांनी केले. यावेळी डॉ. श्वेता शिंदे व ऊस तोडणी युवकाने मनोगत व्यक्त केले. यावेळी नीरा-भीमा कारखान्याचे उदयसिंह पाटील, सरपंच किरण पाटील, महादेव घाडगे, प्रतापराव पाटील, दत्तूअण्णा सवासे, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, दत्तात्रय पोळ, पंडितराव पाटील, संतोष पाटील, वसंत शेंडगे, शिवाजी पवार, शिवाजी माने, काशिनाथ अनपट, गौतम गायकवाड, कार्यकारी संचालक सुधीर गेंगे पाटील, शेतकी अधिकारी डी .एम. लिंबोरे, संग्राम मोहिते उपस्थित होते. सुत्रसंचलन व आभार सुभाष घोगरे यांनी मानले.
Home Uncategorized ऊस तोडणी मजुरांच्या आरोग्य तपासणीचा ‘इंदापूर पॅटर्न ‘ राज्यभर पोहचेल- हर्षवर्धन पाटील