वैभव पाटील :प्रतिनिधी
पालघर तालुक्यातील महत्त्वपूर्ण व प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ग्रामपंचायती मधील उंबरपाडा – सफाळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सत्ताधारी बहुजन विकास आघाडी पक्षाला कायमचे नेस्तनाबूत करण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्रित येवून परिवर्तन पॅनलची स्थापना करून जोरदार आणि अत्यंत अटीतटीचा सामना देण्यासाठी प्रचार केला होता. मात्र विकासाच्या ठोस मुद्द्यावर नागरिकांच्या मनामनात घर करणाऱ्या बाविआला मतदारांनी दणदणीत विजयी करून त्यांची एकहाती सत्ता अबाधित ठेवली आहे. अटीतटीच्या या चुरशित सरपंच पदासह एकूण १७ उमेदवार विजयी झाल्याने पुन्हा एकदा शिटीचा आवाज दुमदुमला आहे.
तालुक्यातील सफाळे परिसरात ग्रामपंचायत निवडणुकीत प्रत्येकवेळी उंबरपाडा – सफाळे ग्रामपंचायत नेहमीच प्रतिष्ठेची आणि चर्चेची मानली जाते. टाऊनशिप प्लॅनिंग असणारी तालुक्यातील बहुदा हीच पहिली ग्रामपंचायत मानली जाते. मागील २० ते २५ वर्षांपासून या ग्रामपंचायतीवर बहुजन विकास आघाडीची एकहाती सत्ता आहे. गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढून ग्रामपंचायतीवर ताण येवूनही आजही नागरिकांच्या मूलभूत गरजा भागविण्यात बवीआ ने कोणतीच कसर ठेवली नाही. गावातील अंतर्गत रस्ते, अंगणवाड्या, समाजमंदिर, गटार लाईन, पिण्याचे पाणी, कचरा व्यवस्थापन आदी कामांमध्ये वेळोवळी नावीन्यपूर्ण प्रयोग करून नागरिकांच्या गरजा भागविण्यात नेहमीच मोलाची कामगिरी केली होती.
मात्र एकीकडे असे असतानाही मनसे, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन विकास आघाडी, लोकप्रहार सेना, आदिवासी एकता परिषद आदींनी यंदाच्या निवडणुकीत एकत्रित येवून परिवर्तन पॅनल ची स्थापना केली. या सर्व पक्षीय पॅनलच्या माध्यमातून सत्ताधारी बवीआचा पायउतार करण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. विविध नवीन उमेदवार देवून नागरिकांपुढे पर्याय उपलब्ध करून विकासाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. या पॅनलच्या माध्यमातून बहुजन विकास आघाडीच्या सत्तेला भेदण्यासाठी जंगजंग पछाडण्यात आले. मात्र विकास कामांच्या जोरावर व आगरी सेना कार्याध्यक्ष चंदुलाल घरत यांची साथ मिळाल्याने बविआच्या मजबूत भिंतीला छेदण्यात सर्वपक्षीय पॅनल सपशेल अपयशी ठरल्याचे चित्र निवडणुकीच्या निकालातून दिसून आले आहे.