इस्त्रीसाठी दिलेल्या कपड्यात निघाले तब्बल 6 लाख रुपये किमतीचे दागिने,प्रामाणिक लॉन्ड्री चालकाने दागिने केले परत..

पुणे : राज्यात रोज खून, दरोडा, चोरीच्या घटना घडतात. दागिन्यांची चोरी होण्याचे प्रमाण तर बरेच आहे.चुकून एकादा दागिना हरवला तर तो परत मिळण्याची शक्यता धुसरच असते. आपल्या आजूबाजूला आजकाल प्रामाणिक लोकांची संख्या फार कमी झाली आहे. अशा परिस्थितीत आपली नितीमत्ता ढळू न देणाऱ्या एका माणासाचे उदाहण समोर आले आहे. पुण्यातील व्यंकटेश सोसायटीमधील राजकमल कनोजिया यांनी तब्बल सहा लाख रुपयांचे सोन्याचे दागिने परत केले आहेत. कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता त्यांनी सोन्याचे मंगळसूत्र, अंगठी, गळ्यातील हार असे दागिने सुखरुप ठेवले आणि मालकाला ते परत केले आहेत. विशेष म्हणजे राजकमल कनोजिया हे अमराठी असून ते लॉन्ड्रीचालक आहेत. त्यांच्या या प्रामाणिकपणाची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे.
नेमकं काय घडलं ?
पुण्यातील व्यंकटेश सोसायटीमधील अशोक कनोजिया यांनी रविवारी इस्त्रीसाठी आपले कपडे शुभलक्ष्मी ड्रायक्लिनर्समध्ये दिले होते. त्यानंतर मंगळवारी हे कपडे इस्त्री करताना राजमल कनोजिया यांना कोटाच्या खिशामध्ये सोन्याचे दागिने आढळून आले. सोन्याच्या दागिन्यांचे पाकिट बाजूला काढून कपड्याला इस्त्री केल्यानंतर राजकमल कनोजिया यांनी सोन्याचे दागिने अशोक कनोजिया यांच्या घरी नेऊन दिले. याआधी सोन्याचे दागिने मिळत नसल्यामुळे अशोक कनोजिया हतबल झाले होते. तब्बल सहा लाख रुपयांचे दागिने हरवल्यामुळे त्यांची झोप उडाली होती. मात्र ड्रायक्लिनर राजकमल अनोजिया यांनी अशोक कनोजिया यांना कपड्यासह त्यांचे सोन्याचे दागिने परत दिले. आपले दागिन परत भेटल्यामुळे अशोक कनोजिया यांचा जीव भांड्यात पडला आहे.
राजकमल कनोजिया यांचा केला सत्कार
दरम्यान, दागिने परत मिळाल्यानंतर अशोक कनोजिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे. घरात लग्नकार्य असल्याने घरी बहीण आली होती. तिचे दागिने माझ्या खिशामध्ये ठेवले होते. मात्र, ते सापडत नसल्याने मागिल आठवड्यापासून आम्ही शोधत होतो, असे अशोक कनोजिया यांनी सांगितलं. दागिने परत मिळाल्यामुळे ड्रायक्लिनर राजकमल कनोजिया यांचे अशोक कनोजिया यांनी आभार मानले आहेत. राजकमल कनोजिया यांच्या या प्रामाणिकपणाचे कौतूक केले जात आहे. राजकमल कनोजिया यांचा व्यंकटेश सोसयाटीमध्ये प्रजासत्तादिनी सत्कार करण्यात आलाय.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here