इंदापूर : बावडा प्रतिनिधी – इंदापूर तालुक्यात गेली 70 वर्षांपासून हिंदू-मुस्लीम समाज एकोप्याने व बंधुभावाने राहत असून पिढ्यान पिढ्या एकमेकांना सुख दुखात साथ देत आहोत. इंदापूर तालुक्यातील हिंदू-मुस्लीम एकोपा आदर्श असा आहे, असे गौरोदगार भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काढले.
बावडा येथील जामा मस्जिदमध्ये पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे वतीने दावत-ए-ईफ्तार पार्टीचे गुरुवारी (दि.28) आयोजन करण्यात आले होते. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी रमजान महिन्याच्या सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. तसेच याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी मस्जिदमध्ये प्लेव्हिंग ब्लॉक बसण्यासाठी रु. 3 लाखाचा निधी जाहीर केला व तात्काळ कामाला सुरुवात होईल असे जाहीर केले.
ज्येष्ठ नेते शंकररावजी पाटील उर्फ भाऊ यांचे सन 1952 पासून राजकीय, सामाजिक आदी सर्वच क्षेत्रात आपण सर्वधर्मसमभावाने एकत्रपणे काम करीत आहोत. बावडा गावामध्ये मुस्लिमांसह सर्व समाजाला बरोबर घेऊन आपण काम करीत असून आगामी काळातही करीत राहू, असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
मुस्लिम धर्मात रमजान महिन्याचे अनन्यसाधारण महत्व आहे. या काळात अल्लाहकडे घातलेल्या साकड्याचे फळ प्रत्येकाला मिळते, अशी धारणा आहे. अल्लाह प्रत्येकाला निरोगी आरोग्य देवो, अशी प्रार्थना यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी भाषणात केली.याप्रसंगी ज्येष्ठ नेते अशोकराव घोगरे, माजी सरपंच समीर मुलाणी, मुनीर आतार यांची भाषणे झाली. यावेळी हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते मुस्लिम बांधवांना रमजान सणासाठी किटचे वाटप करण्यात आले. यावेळी नीरा-भीमा कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील, मनोज पाटील, अमरसिंह पाटील, विकास पाटील, सरपंच किरण पाटील, उपसरपंच निलेश घोगरे,अंकिताताई पाटील युवा मंच बावडाचे शाहरुख जमादार आदींसह पदाधिकारी, ग्रामस्थ व मुस्लीम बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन एस.टी मुलाणी तर आभार आमिर मुलाणी यांनी मानले.
Home Uncategorized इंदापूर तालुक्यातील हिंदू-मुस्लीम एकोपा आदर्श :हर्षवर्धन पाटील – बावडा येथे इफ्तार पार्टी...