उपसंचालक आरोग्य विभाग पुणे यांच्या कार्यालयासमोर अमरण उपोषणाला बसण्याचा सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय मिसाळ यांनी दिला इशारा.
इंदापुर (प्रतिनिधी:निलकंठ भोंग)-इंदापूर येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुहास शेळके हे शासकीय नोकरीत असताना देखील ओजस नावाचे कान, नाक, घसा हे हॉस्पिटल स्वतःच्या नावाने चालवत असल्याकारणाने त्यांना शासकीय उपजिल्हा रुग्णालयात वेळ देता येत नसून ते शासकीय रुग्णालयात सतत गैरहजर असतात याबाबतची तक्रार ( दि. 25 नोव्हेंबर) जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नांदापूरकर यांना सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय मिसाळ यांनी केली होती. दरम्यान इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात मानवी अवयव विल्हेवाट उघड्यावर होत असल्याचे उघडकीस आल्यानंतर वरिष्ठ पातळीवरून चौकशी साठी डॉ. संजीव कदम उपसंचालक आरोग्य विभाग पुणे, डॉ.मिलिंद नांदापूरकर जिल्हा शल्यचिकित्सक पुणे आले असता, पत्रकार परिषदेत डॉ.नांदापूरकर यांनी सदर प्रकार अमानवीय व किळसवाणा असून यात कोणी दोषी आहे त्यांच्यावर कठोर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते. त्याचबरोबर सरकारी रुग्णालयात नोकरीस असणाऱ्या डॉक्टरांना त्यांचे खाजगी रुग्णालय चालवता येणार नाही असे स्पष्ट केले होते. आणि असे कुणी करत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आश्वासनही दिले होते. व आज पर्यंत अशा डॉक्टरांविरोधात माझ्या कार्यालयाकडे कोणताही अर्ज आलेला नाही असे सांगितले होते. परंतु एक महिन्यापूर्वीच डॉ. शेळके यांच्या बाबत तक्रारी अर्ज दाखल असतानादेखील कार्यवाही न करता चुकीची माहिती देऊन पत्रकारांची फसवणूक केली आहे. यावरून असे लक्षात येते की डॉक्टर शेळके व डॉक्टर नांदापूरकर यांचे आर्थिक हितसंबंध असून त्यामुळे डॉ.नांदापूरकर हे डॉ. शेळके यांच्यावर ती कोणतेही कारवाई करत नाहीत. असा स्पष्ट आरोप सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय मिसाळ यांनी केला आहे. डॉक्टर नांदापूरकर यांनी अर्जाची दखल घेऊन कार्यवाही केली असती तर इंदापूर उपजिल्हा रुग्णालयातील हा किळसवाणा प्रकार घडला नसता. त्यामुळे या सर्व प्रकारास डॉ. शेळके यांना दोषी धरुन डॉ.नांदापूरकर यांनी त्यांच्यावर कार्यवाही केली नाही म्हणून त्यांची चौकशी करून त्यांचे वैद्यकीय परवाने रद्द करण्याची मागणी मिसाळ यांनी केली आहे.डॉ. नांदापूरकर हे डॉ.शेळके यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असून सदर प्रकरणाची १५ दिवसाच्या आत चौकशी करून डॉ.नांदापूरकर व डॉ. शेळके यांचे निलंबन करून त्यांची वैद्यकीय परवाने रद्द करण्यात यावेत. अन्यथा उपसंचालक आरोग्य विभाग पुणे यांचे कार्यालय समोर आमरण उपोषण करणार आहे.
-सामाजिक कार्यकर्ते
दत्तात्रय मिसाळ निमगाव केतकी