इंदापूर : इंदापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्या असलेल्या ऐतिहासिक गढीचे संवर्धन करण्यात येणार आहे. या संदर्भात भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राज्याचे सांस्कृतिक कार्य, वन व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मुंबईत गुरुवारी (दि.9) भेट घेऊन चर्चा केली.
इंदापूर येथे मालोजीराजे भोसले यांची इतिहासाची साक्ष देणारी ऐतिहासिक गढी असून मालोजीराजे भोसले यांना इंदापूर येथे झालेल्या लढाईत वीरमरण प्राप्त झाले. त्यांच्या पादुका इंदापूर शहरात आहेत. मालोजीराजांचे स्मारक उभारणे, इंदापूर शहरातील ऐतिहासिक विविध ठिकाणांचे संगोपन करणे, ऐतिहासिक स्थळ असलेला रामेश्वर नाका, ऐतिहासिक भार्गवराम तलाव सुधारणा करणे, इंदापूर शहरातील विविध ठिकाणची जुनी ऐतिहासिक शिल्पे संरक्षित करणे या संदर्भातील सुधीर मुनगंटीवार यांच्याशी हर्षवर्धन पाटील यांनी चर्चा केली. या संदर्भात पुढील कार्यवाहीच्या सूचना सुधीर मुनगंटीवार यांनी संबंधितांना दिल्या आहेत, अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.