इंदापूर || एका दिवसासाठी “शिवाजी महाराज” बनून अजरामर झालेला शिवबांचा मावळा म्हणून ज्यांची ओळख आहे अशा शूरवीर शिवबा काशिद यांच्या जयंती महोत्सवाचे उद्या थाटामाटात आयोजन करण्यात आले आहे.
शिवा काशीद हे शिवाजी राज्यांच्या सैन्यात न्हावी होते. त्यांनी शिवाजी महाराजांवर आणि पर्यायाने मराठी राज्यावर आलेल्या संकटाचे निवारण करतेवेळी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, म्हणून शिवाजीराजे सिद्दी जोहरने पन्हाळगडाला दिलेल्या वेढ्यातून सुखरूप निघाले व विशाळगडावर पोहचले. हे शिवा काशीद हुबेहूब शिवाजी राजांसारखे दिसत असत. अशा या शूर वीर मावळ्याची जयंती उत्सव महाराष्ट्र नाभिक महामंडळ इंदापूर तालुका व शहर समस्त नाभिक समाज यांच्या मार्फत उद्या आयोजित करण्यात आला आहे.
उद्याच्या होणाऱ्या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळे साहेब, प्रमुख पाहुणे प्रसिद्ध शिवव्याख्याते निलेश जगताप, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे राज्य कार्याध्यक्ष दामोदर बिडवे, राज्यप्रमुख सतिश कसबे, इंदापूर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष व प्रमुख उपस्थितीत माजी नगराध्यक्ष विकासरत्न अंकिता भाभी शहा असणार आहेत.
उद्या दिनांक 30 मे रोजी सकाळी 11 वाजता शूरवीर शिवबा काशिद यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक निघणार असून दुपारी 3 ते 5 या काळात स्नेहभोजनाचे आयोजित केले आहे. इंदापूर नगरपालिका मैदानामध्ये सायंकाळी 5 ते 7 या वेळात सर्व मान्यवरांचा सत्कार समारंभ होणार असून ठीक 7 वाजता व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.उद्या होणाऱ्या या भव्यदिव्य कार्यक्रमाच्या नियोजनामुळे उद्याच्या दिवशी इंदापूर शहरातील सर्व सलूनची दुकाने बंद राहतील.“स्वराज्य” एक लहानसा शब्द पण आपल्या अपत्या प्रमाणे शिवाजी महाराजांनी व त्यांच्यासाठी प्राण देणाऱ्या मावळ्यांनी हे स्वराज्य उभं केलं, आपल्या रक्तानं त्याचं सिंचन केलं. अशाच पराक्रमी शूरवीर शिवरत्न शिवबा काशिद यांच्या जयंती महोत्सवाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र नाभिक महामंडळ इंदापूर तालुका व शहर समस्त नाभिक समाजा द्वारे करण्यात आली आहे.