करमाळा (प्रतिनिधी:देवा कदम)-श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना गेल्या तीन वर्षांपासून संचालक मंडळाच्या चुकीच्या कारभारामुळे बंद पडलेला आहे. सदर साखर कारखान्यामध्ये अंदाजे 72 कोटी रुपयांची साखर (दोन लाख तीस हजार क्विंटल) पडून आहे. दिनांक 19/08/2020 रोजी मा. औद्योगिक न्यायालयाने साखर विक्री बाबत निर्णय दिला होता. सदर निर्णयात १५० रु. प्रति क्विंटल कामगारांचे थकीत पगारासाठी वापरावेत. व १५० रु. प्रति क्विंटल प्रमाणे कारखाना मेंटेनन्स साठी वापरून कारखाना सन २०२०-२१ चालू करण्यासंबंधी आदेश झाले होते. परंतु कारखाना संचालक मंडळाने 70000 क्विंटल साखर विक्री करून देखील, कामगारांचे थकीत पगार दिले नाहीत. व कारखान्याचा सीजन हे चालू केला नाही. अशाप्रकारे संचालक मंडळाने कोर्टाचे निर्णयाचा अवमान केलेला आहे. याच मुद्द्याला धरून कारखान्यातील कामगारांनी सोलापूर येथील औद्योगिक न्यायालयात साखर विक्री करून, कामगारांचे थकीत देणी द्यावेत व कारखाना चालू करावा. याकरिता कारखाना संचालक मंडळ MSC बँक प्रशासन व बारामती ॲग्रो यांना पार्टी केलेले आहे, सदर प्रकरणी अजून न्यायालयातील निर्णय झालेला नाही.
परंतु सध्या नवीनच स्थापन झालेली आदिनाथ बचाव समिती कारखाना सुरू व्हावा. व सहकारी तत्त्वावर राहावा याकरिता प्रयत्न करत आहे असे वृत्तपत्रातील बातम्यांवरून समजते. पण साखर विक्री किंवा तत्सम विषय निर्णय घेण्याचे संविधानिक अधिकार समितीला प्राप्त नाहीत. त्यामुळे आदिनाथ बचाव समितीने साखर विक्री बाबत व कामगारांबाबतच्या न्यायालयीन प्रक्रियेतील प्रश्नांमध्ये हस्तक्षेप करू नये. कामगारांमध्ये फूट पाडण्याचे किंवा न्यायालयीन प्रकरणांमध्ये आडकाठी घालू नये. याबाबत आदिनाथ बचाव समितीला योग्य ती समज द्यावी. अशाप्रकारची विनंती करमाळा तहसीलदार समीर माने यांना शेतकरी कामगार संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्यातील कामगारांनी दशरथ कांबळे यांना, आदिनाथ बचाव समिती साखर विक्री बाबत करत असलेल्या वक्तव्याबाबत निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल घेऊन कारखान्यातील कामगार व शेतकरी कामगार संघर्ष समितीच्या वतीने संयुक्तपणे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. व येत्या 20 मार्च रोजी आदिनाथ कारखान्यातील सभासदांची होणारी आमसभा ही ऑनलाइन न घेता ती कारखाना परिसरामध्ये असलेल्या प्रशस्त जागेत घ्यावी. अशा प्रकारची ही सूचना शेतकरी कामगार संघर्ष समितीच्या वतीने यावेळी संचालक मंडळाला करण्यात आलेली आहे.