– अर्थसंकल्पात सर्व समाजांना न्याय
इंदापूर : शिवसेना-भाजप युती सरकारच्या सन 2023-24 च्या अर्थसंकल्पामध्ये उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध समाजांच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या आर्थिक महामंडळासाठी भरीव निधीची केलेली तरतूद स्वागतार्ह आहे. त्यामुळे अर्थसंकल्पामध्ये सर्व समाजाला न्याय देण्यात आला आहे, असे प्रतिपादन इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा कोअर कमिटीचे प्रमुख राजवर्धन पाटील यांनी शुक्रवारी केले.
लिंगायत समाजासाठी महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ, गुरव समाजासाठी संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ, रामोशी समाजासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ, वडार समाजासाठी पैलवान कै. मारुती चव्हाण आर्थिक विकास महामंडळ, या महामंडळाची नव्याने स्थापना करण्यात येऊन त्यासाठी प्रत्येकी 50 कोटी रुपये निधी देण्याच्या घोषणेचे राजवर्धन पाटील यांनी स्वागत केले.
ते पुढे म्हणाले, छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी ), या संस्थेचे नाशिक येथे विभागीय कार्यालय स्थापन करण्याचा व तेथे अभ्यासिका आणि मुला-मुलींच्या वसतीगृहासाठी 50 कोटीची केलेली तरतूद स्वागतार्ह आहे. तसेच बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत या संस्थांच्या निधीतही अर्थसंकल्पात वाढ करण्यात आली आहे.
अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य शेळी मेंढी विकास महामंडळाच्या स्थापनेची घोषणा अर्थसंकल्पात केली आहे. या महामंडळाचे मुख्यालय अहमदनगर येथे असणार आहे. तसेच धनगर समाजासाठीच्या 22 योजनांचे एकत्रिकरण करून, या योजनांची अंमलबजावणी मंत्रिमंडळाच्या शक्तीप्रदत्त समितीमार्फत प्रभावीपणे करण्यात येणार असून त्यासाठी अर्थसंकल्पामध्ये 1000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे राजे यशवंतराव होळकर मेष महामंडळ व राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ यातून धनगर समाजासाठी 10 हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्याची अर्थसंकल्पात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली घोषणा स्वागतार्ह असल्याचे राजवर्धन पाटील यांनी नमूद केले.
तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ, शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळ, इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास आर्थिक महामंडळ, वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळ, मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ, संत सेनानी महाराज केश शिल्पी महामंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळ आदी अनेक महामंडळाच्या वार्षिक निधीमध्ये भरीव तरतूद करण्यात आली आहे, त्याचा फायदा त्या-त्या समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी निश्चितपणे होईल, असे मत राजवर्धन पाटील यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे नेतृत्वाखाली शिवसेना-भाजप सरकारने अर्थसंकल्पामध्ये केलेल्या भरघोस आर्थिक तरतुदीमुळे सर्व समाज बांधवांची प्रगती आता वेगाने होईल, असा विश्वासही यावेळी राजवर्धन पाटील यांनी व्यक्त केला.