महाराष्ट्रात रोज नव नवीन चोरी व अपहरणाचे प्रकार आपण पहात किंवा वाचत असतो परंतु शनिवारी झालेल्या प्रकरणामुळे सर्वांचे डोळे उंचावले व या प्रकरणात ॲड जयश्री गोरे ह्या हिरकणी सारखे लढल्या व जिंकल्याही…. याबाबत सविस्तर वृत्त असेकी पुसेगावमध्ये शनिवारी मध्यरात्री एक थरारक प्रसंग घडला. कार थांबवून पाण्याची बॉटल आणायला पती व दाजी गेल्यानंतर एकाने अचानक कारमध्ये घुसून ती हायजॅक केली.कारचा ताबा घेत ती वेगाने दामटली. या कारमध्ये महिला, तान्हे बाळ, मुलगी व युवती असल्याने सारेच भेदरून गेले. या परिस्थितीमध्येही महिलेने तान्ह्या बाळासह संशयिताला अर्धा किलोमीटरपर्यंत झुंज दिली. चालत्या कारमध्ये झालेल्या झटापटीत 4 महिन्यांच्या बाळासह महिला जखमी झाली. दरम्यान, रात्री सर्च राबवून पोलिसांनी संशयिताच्या मुसक्या आवळल्या. अभिजित ज्ञानदेव फडतरे (वय 29, रा. फडतरवाडी, नेर, ता. खटाव) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. अॅड. जयश्री महेश गोरे (वय 35, रा. रविवार पेठ, सातारा) यांनी पुसेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 25 रोजी मध्यरात्री 12 वाजता घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार अॅड. जयश्री गोरे या दि. 25 रोजी दुपारी पती अॅड. महेश, मुलगा विश्वजित (वय 4 महिने), मुलगी वेदांतिका (वय 8), भाची रुपाली (वय 21) व त्यांचे दाजी उत्तम होळ यांच्यासोबत कामानिमित्त शिखर शिंगणापूर व नातेपुते येथे गेले होते. रात्री 10.15 वाजण्याच्या सुमारास ते नातेपुतेहून साताराकडे कारमधून (एमएच 11 सीजी 8181) यायला निघाले होते. रात्री 12 वाजता ते पुसेगाव येथे आल्यानंतर तहान लागल्याने पाणी घेण्यासाठी शिवाजी चौकात कार थांबवली. यावेळी कारमधून अॅड. महेश गोरे व उत्तम होळ दोघेही खाली उतरले व पाणी बॉटल आणण्यासाठी गेले. यावेळी कारमध्ये अॅड. जयश्री गोरे ड्रायव्हर सीटलगत बसल्या होत्या व त्यांच्याजवळ त्यांचे लहान बाळ होते. तर पाठीमागे मुलगी व भाची बसलेली होती. पती व दाजी काही अंतरावर गेले असतानाच अचानक कारमध्ये अंदाजे एक 25 वर्षीय युवक ड्रायव्हर सीटवर बसताच तक्रारदार यांनी अनोळखी युवकाला ‘तू कोण आहेस? खाली उतर,’ असे म्हणताच त्याने कार स्पीडने चालवण्यास सुरुवात केली. यावेळी महिलेने आरडाओरडा करताच संशयित युवकाने साताराच्या दिशेने कार घेत महिलेला दमदाटी करण्यास सुरुवात केली. दमबाजी करतच तो चालक कार दामटवत होता. यावेळी कारमध्ये महिला व त्या चालकांमध्ये जोरदार झटापट सुरू होती. या झटापटीत तान्हे बाळ सीटवरुन खाली पडले. सुमारे 7 मिनिटे हा थरार सुरु असतानाच महिलेने पुन्हा हॅन्ड ब्रेक ओढत पायाने स्टेअरिंगवर लाथ मारली. यामुळे संशयिताचा कारवरील ताबा सुटला व कार येरळा नदीचा मुख्य रस्ता सोडून मातीच्या असलेल्या ढिगावर जावून आदळून थांबली. ड्रायव्हर बाजूचा दरवाजा निघाल्यानंतर संशयित युवकाने अंधाराचा फायदा घेवून तेथून पळ काढला.दरम्यान, अज्ञाताने कार पळवली असल्याचे पाहताच अॅड. जयश्री गोरे यांच्या पतीसह चौकात असलेल्या इतर नागरिकांनी कारचा पाठलाग सुरू केला. कार थांबलेल्या ठिकाणी हे सर्वजण पोहोचले. कारमधील सर्वजण भेदरलेले असल्याने त्यांना शांत केले. संशयिताचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता तो पसार झाला. या घटनेनंतर पुसेगाव पोलिस ठाण्यात जावून तक्रार देण्यात आली. रात्री घडलेल्या घटनेनंतर पोलिसही गांगरुन गेले. सपोनि संदीप शितोळे यांनी तात्काळ गस्तीवर असलेल्या पोलिसांना अलर्ट करत कोरेगाव डीवायएसपी गणेश किद्रे यांना सांगितले. पोलिसांनी पथक तयार करुन संशयिताचा शोध घेण्यास सुरुवात केली. पुसेगाव व कोरेगाव पोलिसांनी रात्री सर्च ऑपरेशन राबवून अवघ्या 4 तासात पुसेगाव ते दहिवडी रस्त्यावरुन एका हॉटेल नजीक फिरत असताना संशयिताला ताब्यात घेतले. पोलिसांनी घटनेबाबत विचारणा केल्यानंतर त्याने कबुली दिली. दरम्यान रविवारी त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली.या कारवाईत पोलिस हवालदार भोसले, बर्गे, सचिन जगताप, सुनील अबदागिरे, पी. एल. जगदाळे, महेश पवार यांनी सहभाग घेतला. 👉 अॅड. जयश्री गोरे या लढल्या हिरकणीसारख्या बेडरपणे . लहान बाळ, चिमुरडी, युवती व महिला यांच्यासह कारचे अपहरण करण्याचा थरारक प्रसंग अंगावर काटा आणणारा होता. या घटनेत अॅड. जयश्री गोरे या हिरकणीसारख्या बेडरपणे लढल्या. तान्हे बाळ सोबत असलेल्या या महिलेने एका हाताने बाळाला सांभाळत दुसर्या हाताने कारचा हॅन्ड ब्रेक ओढला तर पायाने त्यांनी संशयिताला लाथा मारण्यास सुरुवात केली.या सर्व प्रकारामुळे पाठीमागे बसलेली चिमुरडी व युवती हादरुन गेल्या. चालत्या कारमध्ये महिला व दोन्ही मुली बचावासाठी संशयित युवकासोबत झटापट करत होत्या. मात्र संशयिताने ‘ए गप्प बसा.ओरडू नका नाहीतर जीव घेईन,’ असे म्हणत महिलेचा गळा धरुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही अॅड. जयश्री गोरे डगमगल्या नाहीत. धाडसाने त्यांच्यासह मुलींनी प्रतिकार केला.